बोपोडीत देशी दारुच्या दुकानात तरुणाला भोसकले

 पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 
बोपोडी यथील मुख्य चौकातील देशी दारूच्या दुकानात पुर्ववैमनस्यातून एकाने सराईत गुन्हेगारावर धारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सायंकाळी सात वाजता घडली.

 या घटनेत जयराज उर्फ पप्पू रंजन पिल्ले (34, बोपोडी) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. योगेश सुर्यवंशी (वय-35) यांनी याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी उमेश झा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश सुर्यवंशी यांचे बोपोडी येथील मुख्य चौकात देशी दारुचे दुकान आहे.  शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास काऊंटरवर असताना त्यांना मागील दरवाज्याजवळ जयराज उर्फ पप्पू रंजन पिल्ले याच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यावेळी त्यांनी मागे जाऊन पाहिले असता  त्यांच्याच वस्तीत राहणारा उमेश झा हातात धारदार शस्त्र फिरवत होता. तो यावेळी ‘मला उम्या भाऊ म्हणतात, ‘माझ्या नादाला कोणी लागायचे नाही’. हे माहित असताना पप्प्या पिल्ले माझ्या नादाला लागला. आता त्याला खल्लास करतो असे म्हणत पप्पू पिल्ले याच्या पोटात धारदार शस्त्राने भोकसले, यात तो गंभीर जखमी झाला. यानंतर पप्पू पिल्लेला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.

याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अजित लकडे करत आहेत.