भाजीपाला वाढविण्यासाठी गटशेतीला प्रोत्साहन द्या : पालकमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन
”ठाणे जिल्ह्यात बारमाही शेती झाली पाहिजे विशेषत: भेंडी, ढोबळी, कारली अशा विविध भाज्या घेण्यासाठी शेतकऱ्यांना गटशेतीच्या माध्यमातून प्रोत्साहित करावे, शहरांमधील गृहसंकुलांमध्ये शेतीतील भाजीपाला थेट विकण्यासाठी ग्रामीण भागातील महिला बचत गटांना देखील वाहतुकीच्या दृष्टीने काही सवलती द्याव्यात, पीक कर्ज, विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त मिळावा,” अशा विविध सूचना ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या.

पालकमंत्री आज नियोजन भवन येथे कृषी विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व तयारी बैठकीत बोलत होते. यावेळी आमदार सुभाष भोईर, जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा जाधव, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, कृषी सभापती उज्ज्वला गुळवी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील, मुख्य वन संरक्षक किशोर ठाकरे, जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे, विभागीय कृषी अधिकारी अंकुश माने यांची उपस्थिती होती.

‘पीककर्ज, विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त मिळावा’
गेल्या वर्षी २०५ कोटी पीककर्जाचे उद्दिष्ट्य असताना १३५ कोटी वाटप झाले, यंदा २२५ कोटींचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे ते साध्य झाले पाहिजे, असे नियोजन करावे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसे समाविष्ट करून घेता येईल हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.