भारत बचाओ करीता  ‘हम दो हमारे दो, सबके दो’ चा नारा

राष्ट्र निर्माण ट्रस्टतर्फे पुण्यात रथयात्रा व सभा ; जनसंख्या नियंत्रण कायद्याची मागणी

वाढती लोकसंख्या ही महागाई, साधनसंपत्तीची कमतरता, बेरोजगारी या गोष्टींना कारणीभूत ठरत आहे. समाजातील काही विशिष्ट घटक प्रमाणाबाहेर वाढणा-या लोकसंख्या वाढीला कारणीभूत आहेत. त्यामुळे हिंदूंप्रमाणेच सर्व धर्म, पंथ आणि जातींना हम दो हमारे दो तो सबके दो चा नियम लागू व्हायला हवा. त्याकरीता भारतामध्ये जनसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्याची मागणी करणा-या भारत बचाओ रथयात्रेने पुण्यामध्ये जनजागृती केली.  राष्ट्र निर्माण ट्रस्टतर्फे काश्मिर ते कन्याकुमारी ते दिल्ली ही भारत बचाओ रथयात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेचे आगमन पुण्यात झाले आणि शनिवारवाडा येथे जनजागृती सभा झाली.

यावेळी आयोजक संजय परदेशी, लोकसंख्या अभियानाचे निमंत्रक प्रा.प्रकाश जोशी, मेजर जनरल (निवृत्त) एस.पी.सिन्हा, शामजी महाराज, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलींद काळे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश चव्हाणके, माया चव्हाणके, वैजयंती परदेशी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सिंहगड रस्ता, शास्त्री रस्ता, टिळक चौकमार्गे शनिवारवाडा येथे यात्रेचा समारोप झाला. अभियानात सहभागी होत लोकसंख्या नियंत्रणाची शपथ यावेळी नागरिकांनी घेतली.  एस.पी.सिन्हा म्हणाले, लोकसंख्या नियंत्रण कायदा होणे अत्यंत आवश्यक आहे. दिवसेंदिवस पृथ्वीवरील साधनसंपत्ती संपत चालली आहे. यामुळे पुढच्या पिढीला सुरक्षित, उत्तम आणि शांततापूर्ण देश आपण द्यायचा असेल, तर लोकसंख्या नियंत्रण हाच एकमेव मार्ग आहे.

कोणत्याही धर्म, पंथ, जातीमधील चाली-रितींना न जुमानता सगळ्यांनी एकत्रितपणे या समस्येला तोंड देणे गरजेचे आहे.  शामजी महाराज म्हणाले, भारत बचाओ रथयात्रा अनेक ठिकाणी अडविल्या गेल्या. वेळोवेळी केवळ हिंदूंना टारगेट केले जात आहे. त्यामुळे हा हिंदुस्थान आहे की पाकिस्तान हा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे. सध्या आपापल्या भाषणांतून अनेकजण समाजाला विनाकारण भडकाविण्याचे काम करीत आहेत, अशा देश तोडणा-यांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.  संजय परदेशी म्हणाले, लोकसंख्या वाढीमुळे धार्मिक असंतुलन झाले आहे. काही जण स्वतंत्र देशाची मागणी देखील करु लागले आहेत. हम दो हमारे दो हा वाक्याप्रमाणे ९९ टक्के हिंदू कार्य करीत आहेत. मात्र, इतर समाज हे पाळत आहेत का, हा प्रश्न कायम आहे. विचार बदलला तरच देश बदलेल, असेही ते म्हणाले. प्रा.प्रकाश जोशी म्हणाले, आज भारताची लोकसंख्या १३४ कोटी इतकी आहे. यामध्ये दरवर्षी २ कोटींनी वाढ होत आहे. ही वाढ अशीच कायम राहिली, तर पुढील काही वर्षात २०० कोटी होईल.

हा लोकसंख्या वाढीचा भस्मासूर संपूर्ण जगाला आणि मुख्यत्वे भारताला अत्यंत हानिकारक ठरणार आहे.  सुरेश चव्हाणके म्हणाले, रथयात्रेच्या माध्यमातून हस्ताक्षर मोहिम राबविण्यात येत आहे. देशभरातून १० कोटी हस्ताक्षर एकत्र करुन राष्ट्रपतींकडे जनसंख्या नियंत्रण कायद्याची मागणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या संकल्पात सर्वांनी मोठया संख्येने सहभागी व्हायला हवे, असेही त्यांनी सांगितले. विजय वरुडकर, गौरी रत्नपारखी डबीर, अतुल साठे, सुनील परदेशी यांनी कार्यक्रमात आयोजनात सहभाग घेतला. नारायण फड यांनी सूत्रसंचालन केले. कर्नल त्यागी यांनी आभार मानले.