मंगळवेढयात दरोडेखोरांचा धुमाकूळ

सोलापूर : पोलीसनामा आॅनलाईन

तालुक्याच्या दक्षिण भागात सीमावर्ती परिसरात असलेल्या सोडडी येथे गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. दरोडेखोरांनी एका महिलेचा गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेण्यास विरोध केला म्हणून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा परिसरात घडली आहे. कस्तुरी रामण्णा बिराजदार (वय ६०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर मलकाप्पा रेवगोंडा बिराजदार (वय ६०) हे मारहाणीत गंभीर जखमी आहेत.

दरोडेखोरांनी अनेक दोन ठिकाणीही घरफोडी केली असून या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमींना उपचारासाठी जत येथील रुग्‍णालयात दाखल केले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर जिल्‍हा पोलिस प्रमुख वीरेश प्रभू हे घटनास्‍थळी दाखल झाले. या गावातील बहुसंख्य लोक उपजीविकेसाठी सांगली व कोल्हापूर भागात ऊसतोडणीसाठी गेले असून गावात वयोवृध्द महिला आहेत. हे गाव कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवर असल्याने दरोडेखोरांना चोरी करुन कर्नाटकाचा आसरा घेणे शक्य होते. त्यामुळे या परिसरात वारंवार अशा घटना घडतात. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.