मंजुळेंचा विद्यापीठातील चित्रीकरणाचा सेट काढण्यास सुरवात

पुणे :पोलीसनामा ऑनलाईन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील खेळाच्या मैदानावर नागराज मंजुळे यांच्या हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा सेट काढण्यास सुरवात केली आहे. चार दिवसापूर्वी विद्यापीठ प्रशासनाने मंजुळेंना ताबडतोब सेट काढून घ्यावा अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल अशी तंबी दिली होती.

नागराज मंजुळेंनी ४ महिन्यापूर्वी विद्यापीठाच्या मैदानावर भाडे तत्वावर जागा घेऊन हा सेट उभारला होता. मात्र कलाकारांच्या तारखांचा मेळ न जमल्याने चित्रीकरणाचे काम रखडले होते. यातच विद्यापीठाने सरकारकडून तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी न घेता जागा दिल्यामुळे वाद निर्माण झाला होता. दरम्यान विद्यापीठ दौऱ्यावर आलेल्या शिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनीही सेट काढण्याच्या सूचना विद्यापीठाला दिल्या होत्या.

विद्यापीठाने ४५ दिवसासाठी दिलेले मैदान ४ महिन्यानंतरही खाली होत नसल्याने मंजुळेंना विद्यापीठाने मैदान खाली करावयास सांगितले होते. अन्यथा कडक कारवाई करू अशी तंबी दिली होती. परंतु आता मंजुळेकडून मैदान खाली करण्यास सुरवात झाली असून काही दिवसात मैदान रिकामे होईल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. मंजुळे म्हणाले, विद्यापीठाने केलेल्या सहकार्याबद्दल मी कायम ऋणी राहील. सेट काढायला सुरवात केल्याने मागील अनेकदिवसाच्या वादावर मात्र आता पडदा पडणार आहे.