मंजुश्री खर्डेकर यांच्या नगरसेविका पदाचा वर्षपूर्ती सोहळा की शक्तिप्रदर्शन

राजेंद्र पंढरपूरे

एरंडवणा प्रभाग क्रमांक १३ मधील भाजपच्या नगरसेविका मंजुश्री संदीप खर्डेकर यांनी शुक्रवारी संध्याकाळी स्नेहमेळावा आयोजित केला होता. या स्नेहमेळाव्याची शहराच्या राजकारणात विषेशतः कोथरुड विधानसभा मतदारसंघात बरीच चर्चा झाली. मंजुश्री खर्डेकर यांचा वाढदिवस आणि नगरसेवक पदाची वर्षपूर्ती असे निमित्त असल्याचे सांगण्यात आले. नगरसेविका खर्डेकर आणि त्यांचे पती आणि भाजपचे पदाधिकारी संदीप खर्डेकर अशा उभयतांनी या मेळाव्यासाठी एक महिना आधीपासून तयारी केली होती.

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ति तसेच प्रशासनातील अधिकारी वर्ग या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. यामध्ये खासदार अनिल शिरोळे, माजी खासदार सुरेश कलमाडी, आमदार जगदीश मुळीक, रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र कांबळे, शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, काँग्रेसचे अभय छाजेड, अरविंद शिंदे, नरेंद्र व्यवहारे, आबा बागुल, तसेच शां.ब.मुजुमदार, वि.द.कराड, हनुमंत गायकवाड, बाळासाहेब अनास्कर, सलील कुलकर्णी, संदीप खरे, अजित गोसावी, प्रदीप गारटकर, शिवाजी चव्हाण, हिंमतराव देशभ्रतार, अशोक धिवरे, चंद्रशेखर दैठणकर आदी मान्यवर होते. शहरातील ब्राह्मण संघटनांचे प्रतिनिधी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोथरुडमधील शाखांचे स्वयंसेवक यांची उपस्थिती लक्षणीय होती. संघाच्या पद्धतीने सामुहिक गायन करुन मंजुश्री खर्डेकर यांना यावेळी आशीर्वाद देण्यात आले. पोलीस खात्यातील प्रभाकर ढमाले, भानूप्रताप बर्गे, राजेंद्र कदम, प्रतिभा जोशी आदी या मेळाव्यात सहभागी झाले होते.

भाजपमध्ये स्नेहमेळाव्याचे निमित्त साधून गिरीष बापट, अनिल शिरोळे, दिलीप कांबळे यांनी शक्तिप्रदर्शन केले होते. त्यांची चर्चा चालू असतानाच मंजुश्री खर्डेकर यांचा स्नेहमेळावा झाला. तोही शक्तिप्रदर्शनाचा भाग असल्याचे मानले जाते.

कोथरुडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्या अनुपस्थितीची चर्चा झाली. विधानसभा अधिवेशनामुळे त्या येऊ शकल्या नाहीत असे सांगण्यात आले.