मंत्रालयातील ‘उंदीर’ घोटाळ्यानंतर आता ‘चहा-नाश्ता’ घोटाळा?

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन
मंत्रालयातील ‘उंदीर’ घोटाळा सर्वत्र चर्चिला जात असतानांच आता परत एक घोटाळा समोर आला आहे. मंत्रालयातील कॅबिनेट मंत्री , राज्य मंत्री तसेच त्यांचा कर्मचारी वर्ग यांचा मंत्रालयातील चहा आणि नाश्ता (अल्पोपहार) यावरील एका वर्षाचा खर्च तब्बल साडे तीन कोटीचा निघाल्याने राज्याच्या राजकीय वर्तूळात मोठी खळबळ उडाली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते निखिल कांबळे यांनी मागितलेल्या माहिती अधिकाराच्या माहितीमधून ही वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यांनी मंत्रालयातील कॅबिनेट मंत्री , राज्य मंत्री तसेच त्यांचा कर्मचारी वर्ग यांचा मंत्रालयातील चहा आणि नाश्ता (अल्पोपहार) यावरील २०१४ ते २०१८ पर्यंतचा प्रत्येक वर्षाचा स्वतंत्ररित्या खर्च अर्जाद्वारे मागितला होता. त्यांना मिळालेल्या माहिती पत्रकात २०१४ ते २०१५ मधील खर्च निरंक दाखवला असून , २०१५ ते २०१६ चा खर्च ५७९९१५६ रुपये एवढा दाखवला आहे. तर २०१६-२०१७ चा खर्च १२०९२९७२ रुपये एवढा केल्याचे समोर आले आहे. तसेच २०१७-२०१८ चा चहा नाश्त्याच्या खर्च तब्बल ३३४६४९०५ (तीन कोटी चौतीस लाख चौंसष्ट हजार नऊशे पाच रुपये ) एवढा खर्च झालेला आहे. त्यामुळे आता एका वर्षातच कोटीने वाढलेले चहा नाश्त्याची बिले सामान्य लोकांना चक्कर आणणारी आहेत असेच म्हणावे लागेल. याबाबत आणखी कुठल्याही मंत्र्याकडून अथवा प्रशासकाकडून खुलासा करण्यात आलेला नाही.

चहा नाश्ताही सामान्यांच्या पैशातून पिणाऱ्या आणि खाणाऱ्या मंत्र्यांना असलेल्या शासकीय सुविधा आणि भत्ते व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे गलेलठ्ठ पगार नेमके कशासाठी असतात असा प्रश्न आता सामान्यांना पडू लागला आहे.

दरम्यान , याविषयी संजय निरूपण यांनी केलेल्या आरोपाला सीएमओ ऑफिस मधून उत्तर दिले आहे. उत्तरात म्हटले आहे हा खर्च केवळ मंत्रालयातील नसून सह्याद्री बंगला ,वर्षा बंगला ,रामगीरी आणि हैद्राबाद हाऊस नागपूर येथील खर्च यामध्ये आहे. तसेच हा केवळ चहाचा खर्च नसून अतिथ्यांना केलेला संपूर्ण खर्च आहे. यामध्ये विशेष बैठकांसाठी केलेला खर्च आहे . यामध्ये देशातील ,विदेशातील सर्व शासकीय अतिथींचा खर्च आहे.