मंत्री गिरीष महाजनांच्याच मतदार संघात धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

जामनेरः पोलिसनामा आॅनलाईन

जामनेरमध्ये आज पहिल्यांदा आलो आहे. तसा कधी योग आला नाही. पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभेने जामनेर जाम झालं सभेला परवानगी मिळू नये, जागा मिळू नये यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रयत्न केले. गिरीश भाऊ आज टाईम तुमचा आहे २०१९ला आमचा टाईम येईल. मौका सबको मिलता है या भाषेत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यावर त्यांच्याच मतदार संघातल्या सभेत हल्लाबोल केला.

हल्लाबोल यात्रेच्या जामनेर मधील सभा आणि रॅली दरम्यान रस्त्यावरील लाईट बंद करणे, भाजपा समर्थकांना घुसवून सभेत व्यत्यय आणणे असे प्रकार केले. सभेला परवानगी मिळणार नाही, जागा मिळणार नाही यासाठी मंत्र्यांनी खटाटोप केला असल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांनी केल्या. त्यामुळे संतापलेल्या धनंजय मुंडे यांनी भाषणाला उभे राहताच संतप्त रूप धारण करत महाजन यांच्यावर मौका सभी को मिलता है। अशा शब्दात हल्लाबोल केला.

ही लोकशाही आहे. जर सरकार नीट काम करत नसेल तर, त्याविरोधात आवाज बुलंद करणे ही विरोधी पक्षाची जबाबदारी आहे. जर हे आंदोलन कोणाच्या डोळ्यात खुपत असेल तर त्यांनी घरी बसावे. असे सांगताना देशाचे चौकीदार असताना देशात मोठमोठे घोटाळे समोर येत आहे. असंच चालू राहिले तर देशाच्या नागरिकांना १५ लाख काही मिळणार नाही. पण, १५ लाखांचे कर्ज प्रत्येक नागरिकांवर होईल अशी भीती व्यक्त केली.
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा म्हणण्याऐवजी आता कुठे आहे महाराष्ट्र माझा असे म्हणावे लागत आहे. भाजप प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार देणार होते. आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा म्हणतात तरुणांनी भजी तळावी. उच्च शिक्षित तरुण आता भजी तळणार का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

भाजप एका निवडणुकीत जनतेला फसवू शकते, वारंवार हे शक्य नाही. येत्या निवडणुकीत जनताच यांना त्यांची जागा दाखवेल. असा विश्वास व्यक्त केला. तसेच जो व्यक्ती २५ वर्षे या भागाचा आमदार आहे तिथे पाण्याचा प्रश्न उद्भवतोय. हा लोकप्रतिनिधी म्हणजे बोंड अळीपेक्षा भयंकर आजार असल्याचा हल्लाबोल केला. ६५ वर्षे आपल्या वडिलधाऱ्यांनी या भाजपला सत्तेपासून का दूर ठेवले हे आज कळत असल्याचे ते म्हणाले.

शरद पवारांची जामनेरच्या सभेत व्हर्च्युअल हजेरी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा तिसरा टप्प्यातील अठरावी सभा आज जामनेर येथे झाली. हल्लाबोल यात्रेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात पक्षाचे सर्वच नेते हजेरी लावतात. त्यानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोपाची सभा होत असते. मात्र आज जामनेर येथील सभेत खासदार सुप्रिया सुळे यांच्यामार्फत मोबाईलमधून विडियो कॉलिंगद्वारे शरद पवार यांनी जामनेरच्या सभेला व्हर्च्युअल हजेरी लावली. सुप्रिया सुळे यांनी मोबाईल जनतेच्या दिशेने दाखवताच कार्यकर्त्यांनी प्रंचड घोषणा देत जल्लोष करायला सुरुवात केली.
भाजपमधील व मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जाणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची आज हल्लाबोल सभा होत आहे. या सभेसाठी लोकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मंत्र्यांनी स्ट्रिट लाईट घालवली, पण स्ट्रिटवरची गर्दी हटवू शकले नाहीत

शहापूर नाका ते सभास्थळी असा दोन किमींची रॅली निघाली होती. पण यावेळी रस्त्यावरच्या स्ट्रिट लाईट घालवलेल्या होत्या. राष्ट्रवादीचा रोड शो फ्लॉप व्हावा यासाठी काही जणांनी स्ट्रिट घालवण्याची तरतूद केली होती. मात्र ते स्ट्रिट वर जमलेली तुफान गर्दी घालवू शकले नाहीत.
यावेळी रस्त्याच्या दुतर्फा प्रंचड गर्दी करत जामनेर वासियांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा. सुप्रियाताई सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे स्वागत केले.

सभेचा अचानक बदलला नुर

जामनेर मधील सभेला भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी घुसखोरी केली होती. गिरीश महाजन यांच्या बाजूने ते घोषणा देत होते. प्रत्त्युत्तर म्हणून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ही घोषणा द्यायला लागले. परिस्थिती हाताबाहेर जाईल की काय अशी अवस्था असतानाच पवार साहेबांच्या व्हर्च्युअल हजेरी नंतर सभेचा अचानक नुरच बदलला. घोषणाबाजी बंद झाली. जयंत पाटील, धनंजय मुंडे आणि सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या विरोधात केलेल्या घणाघाती भाषणांना लोकांनी जोषात प्रतिसाद दिला.

याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा. सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील, आ. दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री अरुण गुजराथी, आ. भास्कर जाधव, चित्रा वाघ , संग्राम कोते, संजय गरुड आदी उपस्थित होते.