महात्मा बसवण्णा अजूनही राज्यकर्त्यांपर्यंत पोहचले नाहीत : अजित पवार

पुणे : पोलिसनामा आॅनलाईन

महात्मा बसवण्णा हे लोकशाही चे जनक आहेत. मात्र आम्ही याचे क्रेडिट इंग्लंडला देत गेलो. जगात सगळीकडे म.बसवण्णांचा प्रचार-प्रसार होत असताना आज आम्हालाच बसवण्णा अजूनही कळाले नाहीत ही दुर्दैवी बाब आहे. अशी खंत माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केली.

लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यता आंदोलनासंदर्भात गुरूवारी बारामती येथे महाराष्ट्र बसव परिषदेचे प्रदेश अध्यक्ष व लिंगायत आंदोलनाचे नेते बसव कथाकार शिवानंद हैबतपुरे यांनी पवार यांची भेट घेतली. यावेळी पवार म्हणाले की, महात्मा बसवण्णा अजूनही राज्यकर्ते व जबाबदार नेते मंडळीपर्यत पोहचले नाही याची खंत वाटते. ते लोकशाही चे जनक असताना देखील आम्ही याचं क्रेडिट इंग्लंडला देत गेलो. जगात सगळीकडे म.बसवण्णांचा प्रचार-प्रसार होत असतांना आज आम्हालाच बसवण्णा अजूनही कळाला नाही ही दुर्दैवी बाब आहे. आज लिंगायत आंदोलन खुप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. स्वतंत्र धर्ममान्यतेच्या बाबतीत आमचा पक्ष सकारात्मक आहे. धर्ममान्यता हा लिंगायतांचा अधिकार असुन तो अधिकार त्यांना मिळायलाच हवा या मताशी आम्ही सहमत आहोत. नेहमीच पुरोगामी शक्तीला बळ देणारे आमचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्याबरोबर लवकरच चर्चा करुन या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करेल. असे आश्वासन पवार यांनी दिले.

जवळपास एक तासभर पवार यांनी वेळ दिला व महात्मा बसवण्णांचा क्रांतिकारी इतिहास, महाराष्ट्र बसव परिषदेचे कार्य जाणून घेतले. परिषदेतर्फे प्रकाशित केलेले महत्वपूर्ण ग्रंथ पवार यांना भेट देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती चे युवानेते अॅड. किशोर मासाळ, किरण गुजर यांच्यासह महाराष्ट्र बसव परिषदेचे पुणे शहराध्यक्ष शरण नरसिंह मुळे, महाराष्ट्र बसव परिषदेचे पुणे विद्यार्थी आघाडीचे शरण शिवराज मुलगे उपस्थित होते.