महाराष्ट्रातील एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांकडे ‘सॉइल हेल्थ कार्ड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

शेतकऱ्यांना जमिनीचा पोत कळावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘सॉइल हेल्थ कार्ड’ योजनेअंतर्गत देशात १२ कोटीहून अधिक मृदा आरोग्य अर्थात सॉइल हेल्थ कार्डाचे वितरण करण्यात आले आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांना १ कोटी ६३ लाख मृदा आरोग्य कार्डाचे वितरण करण्यात आले आहे.

फेब्रुवारी २०१५ सालापासून देशात सॉइल हेल्थ कार्ड ही योजना सुरू करण्यात आली. शेतजमिनीचे आरोग्य कळावे व त्यानुसार पीक पद्धती शेतकऱ्यांनी राबवावी या उद्देशाने ही योजना अस्तित्वात आली. या योजनेचा लाभ देशातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घेतला असल्याचे दिसून येत आहे.

देशात १२ कोटीहून अधिक सॉइल हेल्थ कार्ड
फेब्रुवारी २०१५ ते एप्रिल २०१८ या कालावधीत सॉइल हेल्थ कार्ड योजनेचा देशातील १० कोटी ८० लाख शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. या कालावधीत ३ कोटी ५० लाख मातीचे नमुने तपासण्यात आले तर १२ कोटी ४६ लाख मृदा आरोग्य कार्डाचे वितरण आजपर्यंत करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील १ कोटी ९ लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून राज्यात आजपर्यत १ कोटी ६३ लाख मृदा आरोग्य कार्ड वितरित करण्यात आले आहेत.

अहमदनगर जिल्हा राज्यात आघाडीवर
मृदा आरोग्य योजनेचा लाभ घेण्यात अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी राज्यात आघाडीवर आहेत, या जिल्ह्यातल्या ११ लाख १६ हजार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यत १० लाख ११ हजार मृदा आरोग्य कार्ड वितरित करण्यात आले आहेत. नाशिक हा जिल्हा दुसऱ्या स्थानावर असून या जिल्ह्यातील ७ लाखाहून अधिक शेतकऱ्यांना ६ लाख २८ हजार कार्डाचे वितरण करण्यात आले आहे.
बुलडाणा मृदा आरोग्य कार्ड वितरणात तिसऱ्या स्थानावर असून या जिल्ह्यातील ८ लाख १३ हजार शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला असून या जिल्ह्यात ६ लाख १७ हजार मृदा आरोग्य कार्ड वितरित झाले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात ५ लाखाहून अधिक मृदा आरोग्य कार्ड
मृदा आरोग्य कार्ड योजनेत कोल्हापूर जिल्हा चौथ्या स्थानावर असून या जिल्ह्यात ५ लाख १७ हजार कार्ड वितरित झाले असून या जिल्ह्यातील ६ लाख ४९ हजार शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत.
पुणे जिल्हा मृदा आरोग्य कार्ड योजनेत पाचव्या स्थानावर असून या जिल्ह्यातील ६ लाख ८८ हजार शेतकरी या योजनेत सहभागी झाले तर आजपर्यत या जिल्ह्यात ४ लाख ६३ हजार कार्ड वितरित करण्यात आले आहेत. औरंगाबाद जिल्हा सहाव्या स्थानावर असून या जिल्ह्यातील ६ लाख १९ हजार शेतकरी या योजनेत सहभागी झाले तर आजपर्यंत या जिल्ह्यात ४ लाख ४० हजार कार्डाचे वितरण करण्यात आले आहे.

महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर
मृदा आरोग्य कार्ड वितरित करण्यात उत्तर प्रदेश देशात प्रथम स्थानावर तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. मध्यप्रदेश तिसऱ्या स्थानावर आहे.