महिला जिल्हा क्रिडा अधिकाऱ्याला 80 हजाराची लाच घेताना अटक

बीड: पोलीसनामा आॅनलाईन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बीडच्या महिला जिल्हा क्रिडा अधिकाऱ्याला आणि जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयातील शिपायाला 80 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी झाली.

नंदा गजानन खुरपुडे (वय:46) आणि फईमोद्दिन अल्लाउद्दीन शेख (वय:39) अशी 80 हजार रुपयांची लाच स्विकारलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार यांची गेवराई तालुक्यात बऱ्हाणपुर येथे ‘मावलाई युवक क्रिडा मंडळ’ व व्यायामशाळा नावाची संस्था आहे.त्या व्यायामशाळेच्या बांधकामासाठी 2017-18 मध्ये जिल्हा क्रिडा कार्यालयाकडून मंजुरी मिळाली होती. यासोबतच इतर सहा व्यायाम शाळेच्या बांधकामांना देखील जिल्हा क्रिडा कार्यालयाकडून मंजुरी होती.

तक्रारदार व त्यांच्या सोबत इतर सहा व्यायामशाळेच्या बांधकामासाठी जिल्हा क्रिडा अधिकारी खुरपुडे यांनी प्रत्येकी तीन लाख रुपयांचा पहिला हप्ता मंजूर केला होता. तक्रारदार हे अनुदान मिळण्यासाठी जिल्हा क्रिडा कार्यालयात गेले होते. त्यावेळी अनुदानाची रक्कम बॅंक खात्यावर टाकण्यासाठी जिल्हा कार्यालयातील सर्वांनी मिळून तक्रारदार यांच्याकडे नंदा खुरपुडे आणि शेख यांनी दोन लाखांच्या लाचेची मागणी केली.

तक्रारदार यांनी 18 जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची खातरजमा करण्यात आली. त्यानुसार मंगळवारी (दि. 3 एप्रिल) रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जिल्हा क्रिडा संकुल येथील जिल्हा क्रिडा कार्यालयाच्या आजूबाजूस सापळा लावला. त्यावेळी शिपाई फईमोद्दीन शेखने तक्रारदार यांच्याकडून 80 हजार रुपयांची लाच स्विकारली. त्यानंतर बीड शहर पोलीस ठाण्यात नंदा खुरपुडे आणि शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डाॅ. श्रीकांत परोपकारी, अप्पर अधिक्षक जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधिक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, कर्मचारी दादासाहेब केदार, विकास मुंडे, प्रदिप वीर, राजेश ठाकुर, अमोल बागलाने, आणि चालक मेहेत्रे यांनी केली आहे. नंदा खुरपुडे आणि शेख यांच्या घर झडतीचे काम चालू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.