माझी बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन
”गेली तीन दशके विधानसभेत सदस्य असताना माझ्यावर एकही आरोप झालेला नाही. मात्र,२०१४मध्ये सत्ता येताच आणि मी महसूलमंत्री होताच माझ्यावर खोडसाळपणे आरोप झाले. त्या आरोपांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्यासह सीआयडी, लोकायुक्तांकडून चौकशी झाली आहे. त्यात माझ्यावरील एकही आरोप सिद्ध झालेला नाही. मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. ज्यांनी हे बेछूट आरोप ज्यांनी केले त्यांच्यावर काय कारवाई करणार?”, असा प्रश्न माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी विधानसभेत केला.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर एका वृत्तवाहिनीवर विधिमंडळाच्या कारभाराबाबत आरोप झाले आहेत. यासंदर्भात विधानसभेतही चर्चा झाली. तेव्हा खडसे यांनी वरील प्रश्न केला. ‘माझ्यावरील आरोपात तथ्य असेल तर फाशी द्या’, असेही ते म्हणाले. ‘आमदारांवर कोणीही कथित ऑडिओ क्लिप जाहीर करून बेछूट आरोप करतात. लोकप्रतिनिधींना बदनाम करतात. अशांची चौकशी झाली पाहिजे’, असा मुद्दा हितेंद्र ठाकूर यांनी मांडला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनांची गंभीर दखल घेतली. ‘तथ्यहीन आरोप करून लोकप्रतिनिधींची बदनामी करणाऱ्यांवर काय कारवाई करता येऊ शकेल याबाबत नियम तपासले जातील’, असे आश्वासन त्यांनी दिले. त्याबरोबर सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलवावी, अशी सूचनाही त्यांनी केली.