मी आता भाजपाचा झालो: नारायण राणे

मुंबईः पोलिसनामा ऑनलाईन
काॅंग्रेसमधून भाजपच्या गोटात गेलेले नारायण राणे यांची भाजपाकडून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी सेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. दिल्लीत राहूनही महाराष्ट्राच्या समस्या सोडवता येतातच. मी आता भाजपाचा खासदार झालो असून शिवसेनेला आता काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा, असे आव्हान राज्याचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे नवनियुक्त राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी दिले आहे.
राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर गुरुवारी राणे बोलत होते. यावेळी खासदारकीबाबत तांत्रिक मुद्दे उपस्थित करणाऱ्या सेनेवर त्यांनी जोरदार टिका केली. भाजपने राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे शिवसेना आपल्या मार्गात अडथळा आणू शकत नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. मी खासदार झाल्याचे गुरुवारी प्रमाणपत्र मिळाले आहे. आता शिवसेनेने त्यांना काय करायचे ते ठरावावे. बहुदा उद्या सकाळी ते सरकारमध्ये नसतील, असा टोला राणे यांनी लगावला.भाजपच्या चिन्हावर खासदारकी स्वीकारल्यानंतर आपल्या नवीन पक्षाचे काय होणार, असे विचारता ‘याबाबतचा निर्णय आठवडाभरात घेऊ असे ते म्हणाले. पक्ष अॅडजस्ट करणार की तुम्ही असा प्रश्न विचारला असता, ज्याला गरज आहे त्याने अॅडजस्ट करावे असे खोचक उत्तर राणेंनी दिले.