मुंबई : इमारतींपेक्षा झोपडपट्टीवासियांची प्रतिकारशक्ती उत्तम

मुंबई  : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यभरात कोरोनाचा कहर सुरु असतानाच मुंबई तील सीरो सर्वेक्षणाच्या दिलासादायक अहवाल आला आहे. मुंबई महानगरपालिका, टीआयएफआर यांच्याकडून दुसर्‍या फेरीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार मुंबईत दाटीवाटीच्या भागात अर्थात झोपडपट्टी भागातील रहिवास्यांची चांगली प्रतिकारशक्ती असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

झोपडपट्टीवासियांनी चांगल्या प्रतिकारशक्तीच्या जोरावरच कोरोनावर मात केल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. झोपडपट्टी भागात कोरोना संसर्गात काही प्रमाणात घट झाल्याचेही दिसून आले आहे. त्याशिवाय मोठ्या लोकसंख्येत अ‍ॅन्टिबॉडीजचे प्रमाण टिकून राहिले, तर मुंबईची हर्ड इम्युनिटीच्या मार्गाने वाटचाल सुरु होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अहवालानुसार झोपडपट्टी भागात सर्वात जास्त अँटिबॉडीज 45 टक्के तर इमारतींमध्ये 18 टक्के अँटिबॉडीज आढळून आल्या आहेत. इमारतींपेक्षा झोपडपट्टी भागात अँटिबॉडीज प्रमाण अधिक आहे.

विशेष म्हणजे दुसर्‍या फेरीचे निष्कर्ष हे बहुतांशी पहिल्या फेरीसारखेच आहेत. सर्वेक्षणाच्या दोन्ही फेर्‍यांमध्ये अँटिबॉडीज प्राबल्य हे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये किंचितसे अधिक आढळून आले आहे. सर्वेक्षणाच्या दोन्ही फेर्‍यांदरम्यान आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तिंमध्ये सरासरी 27 टक्के एवढे अँटिबॉडीज प्राबल्य आढळून आले आहे. त्याशिवाय झोपडपट्टी भागात संसर्गात घट झाली आहे. कोरोनाचा प्रतिकार करणार्‍या अ‍ॅन्टिबॉडीजही झोपडपट्टीवासियांमध्येच अधिक आढळून आल्या आहेत.