मुख्याध्यापिकेने शाळेतच 20 विद्यार्थ्यांचे केस कापले!

बेळगाव : शाळेतील विद्यार्थ्यांचे केस वाढलेले आहेत म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिकेने शाळेतील वीस मुलांचे स्वतः केस कापले. बेळगाव जवळील काकती गावातील शाळेत ही धक्कादायक घटना घडली.

काकती येथील ‘सेंट जॉन्स इंग्लिश मीडियम स्कुल’मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेतच वीस विद्यार्थ्यांचे केस कापल्याच्या प्रकरणाची शिक्षण खात्याने गंभीर दखल घेतली असून, शाळेला शिक्षण खात्याचे उपसंचालक ए. बी.पुंडलिक आणि गट शिक्षण अधिकारी लीलावती हिरेमठ यांनी भेट देऊन माहिती घेतली.

शाळेच्या मुख्याध्यापिका किरण तरळे देसाई असून त्यांनीच शाळेतील पाचवी आणि सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या वीसपेक्षा जास्त मुलांचे केस कापल्याचे उघड झाले आहे.

“विद्यार्थ्यांना केस कापून घेऊन या असे सांगूनही केस न कापता शाळेत आल्याने आपणच त्यांचे केस कापल्याचे सांगून,” मुख्याध्यापिका किरण तरळे देसाई यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले आहे.

शिक्षण खात्याचे उप संचालक ए.बी.पुंडलिक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी शाळेच्या व्यवस्थापन मंडळाला नोटीस बजावणार असल्याचे सांगितले.