मोगरा महोत्सवात ‘दगडूशेठ’ला ५० लाख मोग-यांचा पुष्पनैवेद्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

मोग-याच्या ५० लाख फुलांची आकर्षक सजावट… झेंडू, गुलाब, चाफा, लिलीसारख्या फुलांनी सजलेला गाभारा आणि शुंडाभूषण, मुकुट, कान व पुष्पवस्त्र परिधान केलेले गणरायाचे विलोभनीय रुप पुणेकरांनी याची देही याची डोळा अनुभविले. वासंतिक उटी मोगरा महोत्सवानिमित्त दगडूशेठ गणपतीला ५० लाख मोग-यांचा पुष्पनैवेद्य दाखविल्याचा भास होत होता. सुवासिक फुलांनी सजलेले मंदिर आणि गणरायाचे रुप डोळ्यांमध्ये साठविण्याकरीता पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ.बसवराज तेली, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, माणिक चव्हाण यांसह विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते. सुभाष सरपाले आणि सहका-यांनी पुष्परचना केली.

मंगळवार (दि.३) पासून या पुष्पसजावटीची तयारी तब्बल २५० महिला व १०० पुरुष कारागिर करीत होते. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये २ हजार किलो गुलछडी, ५०० किलो झेंडू, १ लाख गुलाब, ५० हजार चाफा, १०० कमळे, १ लाख लिली, जाई-जुई यांसह अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली होती. गणरायाच्या मूर्तीला केलेली रंगीबेरंगी फुलांची सजावट प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये टिपत होता.

मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचे भजन भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले. यावेळी युवा वीणेकरी ह.भ.प. संदीप सपकाळ, भगवान मांगडे, राघोबा सातपुते यांना प्रदान करण्यात आला. आपापली नोकरी सांभाळून तब्बल २० वर्षांहून अधिक काळ उटीभजनामधील सक्रिय सहभागाबद्दल हा सन्मान करण्यात आला.