जिल्हाधिकार्‍यांकडून अपमानामुळे यवतमाळमध्ये 85 डॉक्टरांचा राजीनामा

 यवतमाळ : पोलिसनामा ऑनलाईन टीम – यवतमाळ जिल्हाधिकार्‍यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत यवतमाळ मधील तब्बल 85 डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. त्यांनी काम बंद आंदोलनाला सुरूवातही केली असल्यामुळे खळबळ उडाली आहे. यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी अपमानास्पद वागणूक दिली असा आरोप करत परिषद आरोग्य विभागाच्या मॅग्मो संघटनेच्या 85 वैदयकीय अधिकार्‍यांनी आपले राजीनामे वरिष्ठांकडे पाठविले आहेत.

यवतमाळ डॉक्टरांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा कोलंडणार असून कोरोनाच्या काळात रुग्णांना हाल सहन करावे लागण्याची शक्यता आहे. कोरोना काळात डॉक्टर जीवाची बाजी लावून रुग्णासाठी काम करत आहेत. त्यामुळे डॉक्टर पॉझिटिव्ह आले तर त्यांच्यासाठी आणि परिवारातील सदस्यासाठी महाविद्यालयात बेड उपलब्ध करून द्यावे, आठवड्यातून एक दिवस सुटी देण्यात यावी, तसेच कामाचा अहवाल सादर करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात यावा या मागण्या घेऊन मॅग्मो संघटनेचे डॉक्टर्स जिल्ह्याधिकार्‍यांकडे गेले होते.

तेव्हा यवतमाळ जिल्हाधिकार्‍यांनी अतिशय हीन भाषेत उत्तर देऊन अपमानास्पद वागणूक दिली असा आरोप डॉक्टरांनी केला आहे. त्यामुळे हे डॉक्टर्स संतप्त झाले असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काम करणार्‍या 85 डॉक्टरांनी आपल्या वरिष्ठांकडे राजीनामे पाठवून कामबंद आंदोलन सुरू केले आहेत.