रशियाच्या अध्यक्षपदाची माळ पुन्हा पुतिन यांच्या गळ्यात

मॉस्को : वृत्तसंस्था
रशियामध्ये रविवारी अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मतदान झाले. रशियाचे विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळविला आहे. पुतिन यांच्याशिवाय अन्य सात उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र गेली दोन दशके रशियातील राजकारण व जनमानसावर प्रभाव टाकणाऱ्या पुतिन यांनी विक्रमी ७३.९ टक्के मतांच्या फरकाने आपल्या विरोधकांवर एकहाती मात करत विजय मिळवला. या यशामुळे आणखी सहा वर्षांचा कार्यकाल त्यांना मिळणार आहे. पुतिन यांची कार्यशैली पाहता त्यांना हुकुमशाह असे म्हटले जाते. आणि म्हणूनच मतदानादरम्यान मतदारांमध्ये काहीसा निरुत्साह दिसून आला होता, असे दावे रशियातील राजकीय तज्ज्ञांनी केले होते. परंतु पुतिन यांनी पुन्हा एकदा निर्विवाद विजय मिळवून आपली जनतेवरील पकड व लोकप्रियता सिद्ध केली आहे.