राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भारतीय संघाला सुवर्ण पदक

पोलीसनामा ऑनलाईन

राष्ट्रकुल स्पर्धा 2018 मध्ये भारतीय महिला टेबल टेनिस संघाने भारताचा झेंडा उंच फडकावला आहे. भारतीय महिला संघाने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून इतिहास घडवला आहे. भारतीय संघाने अंतिम फेरीत सिंगापूर संघाला 3-1 ने पराभूत केले.

राष्ट्रकुल खेळात भारताने टेबल टेनिसमध्ये प्रथमच सुवर्णपदक पटकावले आहे. टीम इंडिया नेहमी सिंगापूरपुढे हार पत्करत होती , परंतु यावेळी मनिका बत्रा यांनी आपली चुणूक दाखवत उत्तम कौशल्य पणाला लावून खेळ केला. महिला टेबल टेनिस संघ स्पर्धेत मनिका बत्राने 2 सामने जिंकले. दुसरीकडे, मधुरिका पाटकर आणि मुमादास यांनी भारतीय संघाला 1-1 असे विजय मिळवून दिले ज्यामुळे भारताला संघीय कामगिरीत सुवर्ण पदक प्राप्त झाले. या विजयामुळे कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या खात्यात आता 7 सुवर्ण पदक झाले आहेत.

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर टेबल टेनिस संघाचे अभिनंदन केले. त्यांनी टेबल टेनिसमध्ये पहिल्यांदाच कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.