राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने शालेय विद्यार्थ्यांकरिता अवांतर वाचनासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या भारतीय विचार साधना या संस्थेकडून पुस्तके खरेदी केली आहेत.ही पुस्तके 20 रुपयाला मिळणारी 50 रुपये प्रती दराने खरेदी करण्यात आली.याच्या निषेधार्थ शिक्षण आयुक्त कार्यालया समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन  करण्यात आले. यावेळी शिक्षण आयुक्त विपिन शर्मा यांना या बाबतचे निवेदन देण्यात आले.

यावेळी खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या की, शालेय विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तके खरेदी केली असुन या पुस्तकात आक्षेपार्ह मजकुर आहे.बाल नचिकेता या पुस्तकात  मीलन, कोमार्यभंग आणि कामातुर यासारख्या शब्दाचा भडीमार करण्यात आलेला आहे . या वयोगटातील मुलांना कथा समजावी यासाठी चित्रांचा वापर अधिक केला जातो, पंरतु  या पुस्तकामध्ये कथा गणपती यासारखी एक दोन पुस्तके सोडली. तर उर्वरित साऱ्या  कथा चित्रांशिवाय आहेत. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने बोजड भाषेत लिहिलेल्या आहेत.  अत्यंत कठीण आणि अनावश्यक अशा शब्दाचा वापर केलेला आहे . या पुस्तकामध्ये पौराणिक आणि धार्मिक कथाचा भर आहे. यातुन मुलांवर विशिष्ट विचारधारेचा संस्कार लादण्याचा सरकारचा घाट आहे.ही बाब निषेधार्थ असल्याचे सांगत त्यांनी सरकारच्या कार्यपध्द्तीवर त्यांनी निशाणा साधला.