रुग्णांची सुरक्षितता काळाची गरज : डॉ. अवस्थी

पुणे –

पुण्यातील सूर्या हॉस्पिटलने कॅनडातील मॅकमास्टर चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या सहकार्याने दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे. यामध्ये रुग्णांची सुरक्षितता, नवजात अर्भके व बालकांबाबत दक्षता घेण्याच्या दर्जामध्ये सुधारणेची आवश्यकता हे विषय आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्‌घाटन झाले. सूर्या हॉस्पिटल यापुढे डॉक्टर्स आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांना नवजात अर्भकांची काळजी घेण्याचे प्रशिक्षण देणार आहे.

बालरोगतज्ज्ञ, नवजातअर्भकतज्ज्ञ, प्रसूतीतज्ज्ञ अशा विविध स्पेशालिस्ट डॉक्टरांनी तसेच निवासी डॉक्टरांनी या दोन दिवसाच्या कार्यशाळेत सहभाग घेतला आहे. कॅनडामधील आँटेरिओ प्रदेशातील हॅमिल्टन येथील मॅकमास्टर चिल्ड्रन्स हॉस्पिटलमधील पाच विख्यात आतिथी व्याख्यात्यांनी ही कार्यशाळा घेतली.

बालमृत्यूचा सर्वाधिक धोका असतो जन्म झाल्यानंतरच्या पहिल्या महिन्यात- अर्थात अर्भकावस्थेत. पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्यूमधील ६० टक्के, तर एक वर्षापर्यंतच्या मुलांच्या मृत्यूमधील एक तृतीयांश मृत्यू अर्भकावस्थेत होतात. तीन महिन्यांपर्यंतच्या बाळांचा मृत्यू किंवा अपंगत्व येण्यामागे प्रतिजैवकांची (अॅण्टिबायोटिक्स) सहज उपलब्धता आणि त्याचा अयोग्य वापर यामुळे या समस्येत भर पडते. त्याचप्रमाणे रुग्णालयांतील प्रादुर्भाव-नियंत्रणाच्या पद्धतीही अत्यंत खराब दर्जाच्या असतात.

यावेळी बोलताना सूर्या मदर अॅण्ड चाइल्डकेअरचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक डॉ. भूपेंद्र एस. अवस्थी म्हणाले, “लाखो मुलांना रुग्णालयात चुकीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. कॅनडातील एका अभ्यासानुसार, नऊ टक्के मुलांना अशा वाईट परिस्थितींचा अनुभव येतो. त्यातील ४० टक्के अयोग्य गोष्टींना प्रतिबंध करण्याजोग्या असतात. या कार्यशाळेत आम्ही डॉक्टरांना रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ते प्रशिक्षण मिळेल आणि नवजात अर्भक तसेच बालकांची काळजी घेण्याचा दर्जा सुधारेल याची काळजी घेतली.”

“विशेष नवजात अर्भक दक्षता विभागातील डॉक्टर्स आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सूर्या हॉस्पिटल महाराष्ट्र सरकारसोबत काम करणार आहे. त्याबाबत नर्सिंग होम्स आणि रुग्णालयांना मार्गदर्शनही केले जाईल,” असे सूर्या हॉस्पिटलमधील डॉ. सचिन शाह म्हणाले.

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत म्हणाले, “अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम डॉक्टर आणि हॉस्पिटलसाठी लाभदायक ठरतात. हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या संसर्गांमुळे रुग्णाचा हॉस्पिटलमध्ये राहण्याचा कालावधी वाढतो. हे अत्यंत क्षुल्लक मुद्दे असतात पण त्यावर प्रकाश टाकणे आवश्यक असते. अशा प्रकारची शैक्षणिक मालिका निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची असते”. महाराष्ट्रभरातील डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यासाठी आतापर्यंत ६ खासगी हॉस्पिटल्सतर्फे महाराष्ट्र सरकारला मदत करण्यात येत आहे.

कॅनडातील मॅकमास्टर चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे उपप्रमुख डॉ. मोहन रॉय म्हणाले यांनी डॉक्टर्स व निमवैद्यकीय कर्मचाऱ्याना प्रशिक्षण देण्याची संधी दिल्याबद्दल मी सूर्या हॉस्पिटलचे आभार मानले. रुग्णालयाचे वातावरण अधिकाधिक सुरक्षित करून, वाईट परिस्थितींना प्रतिबंध करून रुग्णांची अधिक चांगली काळजी घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असे ते म्हणाले.