रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून पोलिसास जबर मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

पुर्वी केलेल्या पोलिस कारवाईचा राग मनात ठेवुन दोघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी पोलिस कर्मचाऱ्यास जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री हडपसर परिसरातील पुणे-सासवड रोडवरील रोहित वाईन्स येथे घडली आहे. दरम्यान, हडपसर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. दोनच दिवसांपुर्वी वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत देखील पोलिस कर्मचाऱ्याला धमकी देण्यात आली होती. त्यानंतर ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

बाळु भिमराव डोके आणि नितीन उर्फ पप्पु भिमराव डोके (दोघे रा. वेताळबाबा वसाहत, गाडीतळ, हडपसर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती हडपसर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक एम.पी. भांगे यांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिस नाईक प्रताप हनुमंत गायकवाड (४०, बक्कल नं. २८००, नेमणुक : हडपसर पोलिस स्टेशन) यांनी फिर्याद दिली असुन हडपसर पोलिस ठाण्यात भादवि कलम ३३३, ३४ प्रमाणे आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पोलिस नाईक प्रताप गायकवाड आणि पोलिस नाईक शिवले हे दोघे फुरसुंगी परिसरातील पुणे-सासवड रस्त्यावर पेट्रोलिंग करीत होते. ते दोघे रोहित वाईन्स समोरून जात असताना तेथे लोकांची गर्दी झाली होती. लोकांची गर्दी कशामुळे झाली हे पाहण्यासाठी पोलिस तेथे गेले. त्यावेळी रेकॉर्डवरील गुन्हेगार बाळु आणि नितीन तेथे मोठमोठयाने आरडाओरड करून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना धमकावत होते तसेच आजुबाजुचे दुकाने बंद करून दहशत पसरवित होते.

परिसरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणुन पोलिसांनी आरोपींना समजाविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी नितीन डोकेने पोलिस नाईक प्रताप गायकवाड यांना ओळखले व त्यांना शिवीगाळ केली. मी तुम्हाला ओळखतो तुम्ही माझ्यावर याआधी कारवाई केलेली आहे असे म्हणून बाळु डोकेने पोलिस नाईक प्रताप गायकवाड यांना खाली पाडून मारहाण करण्यास सुरवात केली. त्याच वेळी आरोपी नितीन डोकेने धारदार कठीण वस्तुने त्यांच्या उजव्या कानाच्यावर डोक्यास फटका मारून गायकवाड यांना गंभीर जखमी केले. पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याने परिसरात काही काळ गर्दी झाली. तातडीने हडपसर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. पोलिस नाईक गायकवाड आणि शिवले हे दोघे हडपसर पोलिस ठाण्यात तपास पथकात कार्यरत आहेत.

पोलिस उपनिरीक्षक एम.पी. भांगे आणि त्यांच्या पथकाने आरोपींना अटक केली. काही दिवसांपुर्वीच वाकड परिसरात एका टपरीवाल्याने एका पोलिस कर्मचाऱ्याला गाववाले तुमचे हात-पाय तोडतील अशी धमकी दिली होती. त्यानंतर हा हडपसर पोलिस ठाण्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. आरोपी बाळु आणि नितीन डोके यांचे पुर्वीचे रेकॉर्ड असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिस उपायुक्त दिपक साकोरे, वानवडी विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद पाटील, हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एम.पी. भांगे अधिक तपास करीत आहेत.