रेखा यांच्या जागेवर अक्षयकुमार जाणार राज्यसभेवर ?

नवी दिल्ली :वृत्तसंस्था
राज्यसभेसाठी राष्ट्रपतींकडून कला, संस्कृती, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातीळ १२ व्यक्ती नियुक्त केल्या जातात. यापैकी तीन सदस्यांचा कार्यकाल एप्रिल महिन्यात संपुष्टात येणार आहे. विशेष म्हणजे हे तीनही खासदार मुंबईतून येतात. उद्योगपती अनु आगा, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना राष्ट्रपतींनी नियुक्त केले होते. आता त्यांच्या जागेवर नियुक्ती मिळवण्यासाठी चित्रपटसृष्टी आणि लेखकांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. परंतु, सध्या अक्षयकुमारचे नाव यात आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते.

सभागृहात सर्वांत कमी उपस्थिती असल्याचा विक्रम रेखा यांच्या नावे आहेत. त्या अवघ्या साडेचार टक्केच सभागृहात उपस्थित होत्या. त्यामुळे मोठ्या टीकेला त्यांना सामोरे जावे लागले. रेखा यांच्या जागेवर चित्रपटसृष्टीतील कोणत्या कलाकाराला संधी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यसभेतील रिक्त जागेवर वर्णी लागावी म्हणून अनेकांनी पक्षाच्या हायकमांडशी संपर्क साधला आहे, असे वृत्त ‘नवभारत टाइम्स’ने दिले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या तरी अक्षयकुमार, जुही चावला आणि गजेंद्र चौहान यांचे नाव आघाडीवर आहे. त्याचबरोबर सलमान खानचे वडील सलीम खान, विवेक ओबेरॉय याचे वडील सुरेश ओबेरॉय, ऋषी कपूर, जॅकी श्रॉफ, वहिदा रहेमान, आशा पारेख, मधूर भांडारकर आणि अनुपम खेर यांची शिफारसही सरकारकडे गेल्याचे समजते.