लिफ्टमधून पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

मुंबई: पोलिसनामा ऑनलाईन
गोरेगावच्या पूर्वेकडील मोरारजी मिल म्हाडा संकुल या २१ मजली इमारतीच्या लिफ्टमधून पडून एका ज्येष्ठ नागरिकाचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. मोहन कदम (वय ६२) असे त्यांचे नाव असून बंद पडलेल्या लिफ्टच्या दरवाजातून बाहेर पडताना लिफ्टचा दरवाजा व भिंतीच्या मोकळ्या जागेतून ते पोकळीतून खाली कोसळून ही दुर्घटना घडली.

या संकुलाला ‘ए’ व ‘बी’ विंग आहेत. ‘ए’ विंगमध्ये २० तर ‘बी’ वींगमध्ये २१ मजले आहेत. या इमारतीतील रहिवासी मोहन कदम सकाळी सव्वासहाच्या सुमारास पाचव्या मजल्यावरून खाली येण्यासाठी लिफ्टमध्ये शिरले,परंतु पाचव्या व चौथ्या मजल्याच्या मध्येच लिफ्ट बंद पडली. त्यांना बाहेर काढण्यासाठी लिफ्टचा दरवाजा उघडण्यात आला. दोन मजल्यांच्या मध्येच अडकलेल्या लिफ्टमधून बाहेर पडताना कदम यांचा तोल गेला आणि लिफ्टचा दरवाजा व भिंत यांच्या पोकळीतून ते थेट खाली पडले. पुन्हा लिफ्ट सुरू होऊन ती खाली येण्याचा धोका असल्याने कदम यांना बाहेर काढण्याचा धोका कोणी पत्करला नाही. साडेसातच्या सुमारास अग्निशमन दलाचे जवान आले. त्यांनी लिफ्टचा वीजपुरवठा बंद करून लिफ्टच्या पोकळीतून कदम यांना बाहेर काढले. त्यांना प्रचंड मार लागला होता. उपचारासाठी त्यांना जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.