लोकसंख्या वाढीबाबत सर्व स्तरांवर चर्चा आवश्यकः प्रा.प्रकाश जोशी

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन
“लोकसंख्यावाढीबाबत सामाजिक व राजकीय पातळ्यांवर फक्त बोलले जाते. प्रत्यक्षात त्याचा काहीही उपयोग होत नाही. लोकसंख्या वाढीचा हा भस्मासूर असाच वाढत राहिला तर 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या 200 कोटीपर्यंत जाऊन पोहचेल. त्यामुळे देशाला बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागेल. कुटुंब नियोजन या विषयाला अनुसरून सर्व स्तरांवर चर्चा होणे व मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षात कार्य होणे गरजेचे आहे,” अशी माहिती माईर्स एमआयटीचे संस्थापक सह विश्‍वस्त व लोकसंख्या अभियानाचे निमंत्रक प्रा. प्रकाश जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोकसंख्या अभियान या सामाजिक संस्थेने या विषयाचे गांभीर्य जाणून जनजागृतीचे कार्य मोठ्या प्रमाणात करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. प्रा. जोशी म्हणाले की, कुटुंब नियोजनचा कार्यक्रम खेड्यापाड्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही आरोग्यमंत्र्याना जाऊन भेटणार आहेत. तसेच, जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. वाढती लोकसंख्या हा देशाला भेडसावणारा प्रमुख प्रश्‍न आहे. परंतु दुर्देवाने त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. त्यामुळे वाढती बेकारी, घरांची कमतरता, वाहतुकीची कोंडी, पर्यावरणाचा र्‍हास, गुन्हेगारी या सारख्या असंख्य समस्या या दिवसेंदिवस वाढत जाणार आहेत. या सर्व समस्यांना
थांबविण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.

यासमस्या लक्षात घेऊन सरकारला कडक पावले उचलावी लागतील. त्यासाठी कुटुंबात तिसरे अपत्य झाल्यास त्यांच्या सरकारी सवलती बंद कराव्यात. त्यात प्रामुख्याने धान्य किमतीत सवलत, घरासाठी सवलत, ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणूक लढविण्याचा हक्क इ. मिळणार नाही. विवाहा संदर्भात निर्माण केलेल्या वयोमर्यादेच्या कायदयाचे काटेकोर पालन केले जात नाही. इतकेच नव्हे तर त्यामुळे प्रजोत्पादन सुरू होऊन लोकसंख्या वाढू लागते. कुटुंबनियोजनाचा कार्यक्रम प्रत्येक खेड्यापर्यंत पोहचविण्यासाठी प्रसार माध्यमांचा उपयोग मोठ्या प्रमाणात करावा. कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी देण्यात येणार्‍या रक्कमेत मोठ्या प्रमाणात वाढ केल्यास जननदर कमी होण्यास नक्कीच मदत होईल. साक्षरतेमुळे सुद्धा समाजात जागरूकता निर्माण होऊन कुटुंबनियोजनाला प्रोत्साहन मिळते. त्यातून लोकसंख्येला आळा बसूलन निर्माण होणारे दुष्परिणाम टळतील. देशाची सर्वांगीण प्रगती होईल.

या पत्रकार परिषदेत एमआयटी इंटरनॅशनल एज्युकेशन सेंटरचे संचालक प्रा.सुधीर राणे, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या प्रा.आरती शास्त्री व श्री. वसंत माळी हे उपस्थित होते.