लोहारा येथील सास्तूर-गुबाळ रस्त्यावरील कॅनॉलमध्ये दोन महिलांचे मृतदेह आढळले

लोहारा : पोलीसनामा आॅनलाईन

तालुक्यातील सास्तूर-गुबाळ रस्त्यावरील कॅनॉलमध्ये आज (मंगळवार) सकाळी दहाच्या सुमारास अंदाजे 60 वर्षीय दोन अनोळखी महिलांचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करत आहेत.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, लोहारा तालुक्यातील सास्तुर-गुबाळ रस्त्यावर माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाचा डावा कालवा आहे. यामध्ये सोमवारी ( दि.14) निम्न तेरणा प्रकल्पातील पाणी सोडण्यात आले होते. या कालव्यात दोन अनोळखी महिलांचे मृतदेह आढळून आले. घटनास्थळावरील लोकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर , मिळालेल्या माहितीची खातरजमा करताच पोलिस कॉन्स्टेबल सचिन मुसांडे, पी. एन. इंगळे हे घटनास्थळी दाखल झाले व पाहणी केली.

कॅनॉलजवळ महिलांच्या चपला, पाण्याची बाटली, पिशवी इत्यादी साहित्य आढळून आले. मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले असून, दोन्ही मृत महिलांची ओळख मात्र अद्याप पटली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.