वढू (बु), तुळापूर विकासासाठी भरीव निधीची तरतूद करणार: विनोद तावडे

पुणे: पोलीसनामा आॅनलाईन

क्षेत्र वढू बुद्रुक तसेच तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिस्थळाच्या विकास कामांसाठी भरीव निधीची तरतूद शासनाकडून केली जाईल, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण आणि क्रीडा, उच्च व तंत्र शिक्षण, अल्पसंख्याक व वक्फ बोर्ड, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी केले.

विनोद तावडे

पुणे जिल्हयातील वढूबुद्रुक तसेच तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी श्रीमती वर्षा तावडे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार बाबुराव पाचर्णे, इतिहासकार पांडुरंग बलकवडे, अभिनेते डॉ.अमोल कोल्हे, वढूबुद्रूक गावच्या सरपंच रेखा शिवले, तुळापूरचे सरपंच गणेश पुजारी आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री महोदयांबरोबरच उपस्थितांनीही छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतिस्थळास अभिवादन केले. तसेच शासकीय मानवंदना देण्यात आली.

तावडे म्हणाले, इतिहासाच्या पुस्तकातून जशी आपण विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची ओळख करुन देतो तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाविषयी देखील पाठयपुस्तकात धडा समाविष्ट करण्याबाबत मी इतिहास अभ्यास मंडळास सुचविले आहे. या निमित्ताने येथून पुढील काळात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनावरील महानाटय या ठिकाणी दाखविण्यात येईल. याबरोबरच त्यांच्या जीवनावर आधारीत एक भव्य संग्रहालय उभारण्याची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री या नात्याने विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार बाबुराव पाचर्णे, सिने अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ.अमोल कोल्हे यांना शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला.