वासंतिक पुष्पोत्सवात सजले ‘दगडूशेठ दत्तमंदिर’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

मोग-याच्या लाखो फुलांनी सजलेला दत्तमंदिराचा परिसर…सुवासिक फुलांनी साकारलेला महाराजांचा मुकुट… रंगीबेरंगी फुलांची आकर्षक आभूषणे… शोभिवंत फुलांची आरास… आणि गुलाब, झेंडू, चाफा, लिलीसारख्या नानाविध फुलांनी सजलेल्या दत्तमंदिरात वासंतिक पुष्पोत्सव उत्साहात साजरा झाला. चैत्र अमावस्येला दत्तमहाराजांकरीता केलेली फुलांची आरास व महाराजांचे फुलांच्या दागिन्यांनी सजलेले मनोहारी रुप पाहण्याकरीता मोठया संख्येने भाविक उपस्थित होते.

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे संस्थापिका लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष मोहिते, कार्यकारी विश्वस्त बी.एम.गायकवाड, अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, चंद्रशेखर हलवाई, उल्हास कदम, अंकुश काकडे, अ‍ॅड.एन.डी.पाटील, युवराज गाडवे, नंदकुमार सुतार आदी उपस्थित होते.

पुष्पोत्सवाबाबत माहिती देताना अध्यक्ष शिरीष मोहिते म्हणाले, सुमारे ५५ हजार मोगरा, २० हजार लिली, १५ हजार गुलाब, १५० किलो  झेंडू, २ हजार ५०० चाफा, २ हजार जाई, २ हजार जुई आणि पासलीच्या पानांनी पुष्पोत्सवात सजावट करण्यात आली. सुभाष सरपाले आणि सहका-यांनी ही आरास साकारली.

श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, श्रीमत् वासुदेवानंद टेंभेस्वामी महाराज, श्रीमाणिकप्रभू महाराज या दत्तमहाराजांच्या चार अवतारांच्या प्रतिमा आणि  कै.लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांची प्रतिमा देखील फुलांनी सजविण्यात आली.