वाहतूक शाखेच्या वतीने ‘नॅशनल स्टॉप द ब्लिड डे’ साजरा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

अपघातात जखमींना तातडीचे मदत मिळावी आणि मदत करण्यासाठी नारिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ३१ मार्च हा दिवस ‘नॅशनल स्टॉप द ब्लिड डे’ म्हणून साजरा करण्यात येतो. वाहतूक शाखा पुणे शहर शाखेच्या वतीने शहरातील रुग्णालयांच्या मदतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त आशोक मोराळे यांच्या उपस्थितीत हिंजवडी येथील सुर्या हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये डॉ. राम पवार, डॉ. शहा आणि १०८ रुग्णावाहीकेचे डॉ. शेळके यांनी वाहतूक शाखेकडील १५ अधिकारी आणि १०० कर्मचारी यांना अपघातामधील जखमींना तातडीची मदत तसेच प्रथोमोपचार याबाबतची सविस्तर माहिती दिली.

पोलीस उप आयुक्त अशोक मोराळे यांनी अपघातातील जखमींना करावयाची मदत आणि सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे मत समजावून सांगितले. अपघातातील बळींची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने नागरीकांमधून तसेच फस्ट रिस्पॉडंट म्हणून घटनास्थळी असणारे पोलीस, सुरक्षा रक्षक यांनी कोणती उपाययोजना करावी या विषयी मार्गदर्शन केले. तर अपघाताच्या ठिकाणी असलेल्या फस्ट रिस्पॉडंट यांनी नागरीकांना त्यांचे इच्छेविरुद्ध साक्षीदार बनवू नये असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पोलीस उप आयुक्त कार्यालयातील संस्कार भवन येथील सभागृहात वाहतूक शाखा आणि सह्याद्री हॉस्पिटल यांच्या सयुक्त विद्यमाने व भारती विद्यापीठ वाहतूक विभाग आणि भारती विद्यापीठ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यामने यावेळी दोन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्कार भवन येथे झालेल्या कार्यक्रमात सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. कुलकर्णी यांनी प्रथमोपचार आणि जखमींची घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला ७५ कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते. तर भारती विद्यापीठ हॉस्पिटल मधील डॉ. अदित्य पाटील, डॉ. अनुज यांनी भारती विद्यापीठ वाहतूक विभागातील कर्मचारी, अधिका-यांना मार्गदर्शन केले. यावेळी ५० कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

वाहतूक शाखा आणि हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये २२५ अधिकारी आणि कर्मचा-यारी सहभागी झाले होते. कार्य़क्रमा दरम्यान जखमीवर करण्यात येणा-या प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेण्यात आले.