Pune : अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शेतकऱ्यांची 1 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला. पुण्यातील पौड पोलीस ठाण्यात अभिनेते विक्रम गोखले तसेच जयंत रामभाऊ महाळगी आणि त्यांची पत्नी सुजाता महाळगी यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याबाबत जयंत प्रभाकर बहिरट (वय 57, रा. कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे.

मुळशी तालुक्यातील डोंगरगाव येथे सुजाता फार्म प्रा.लि. गिरीवन प्रोजेक्ट या कंपणीचे जयंत व सुजाता महाळगी हे डायरेक्टर आहेत. तर विक्रम गोखले हे चेअरमन आहेत. गोखले यांनी कंपनी ही एक सरकार मान्य प्रोजेक्ट असल्याचा दावा केला. तसेच त्याबाबत खोट्या जाहिराती करून प्रलोभने देऊन नागरिकांना आकर्षित केले. तसेच रामभाऊ महाळगी यांच्या सामाजिक प्रतिमेचा व प्रसिद्धीचा फायदा घेतला. त्यांनी फिर्यादी व इतर फसवणूक झालेल्या फ्लॅट धारकांना प्लॉटची सरकार मोजणी झाली असल्याचे सांगून आम्ही वकील असून, कायदेशीर बाबीची चिंता करू नये असे सांगितले.

त्यामुळे फिर्यादी व इतरांनी याठिकाणी प्लॉटची खरेदी केली. दरम्यान त्यांनी खरेदी केलेले प्लॉट सरकारी मोजणी करून देत नव्हते. यामुळे प्लॉट धारकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे नियमाप्रमाणे अर्ज करून त्यांच्याकडून विना हरकत मोजण्या करून घ्याव्यात असा अर्ज दाखल केला. त्यावर निर्णय होऊन आदेश देण्यात आला. मात्र तिघे मोजणी करण्यासाठी वेळोवेळी हरकत घेत असल्याचे लक्षात आले. तरीही त्यांनी मोजणी करून घेतली असता त्यांना फसवणूक झाली असलायचे लक्षात आले. यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत अभिनेते विक्रम गोखले यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी झाली. त्यात दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकला. यानंतर न्यायालयाने गोखले यांचा जामीन फेटाळला आहे. यात 14 जणांची एकूण 96 लाख 99 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.