विजयाने बेभान बांगलादेशी खेळाडूंनी ड्रेसिंग रुमचा दरवाजा तोडला?

कोलंबो : वृत्तसंस्था
टी-20 तिरंगी मालिकेच्या निर्णायक सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेवर थरारक विजय मिळवत थेट फायनलमध्ये धडक मारली. पण यावेळी विजयाने बेभान झालेल्या बांगलादेशी खेळाडूंनी थेट ड्रेसिंग रुमचा दरवाजाच तोडल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.

या सामनाच्या शेवटच्या षटकात महमुदुल्लाहने सामना अक्षरश: खेचून आणला. पण त्याआधी झालेल्या गोंधळाने बांगलादेशच्या खेळाडूंचा अखिलाडूपणा पुन्हा एकदा समोर आला.

श्रीलंकेच्या गोलंदाज उदानाने शेवटच्या षटकात लागोपाठ दोन बाउन्सर टाकल्याने बांगलादेशचा कर्णधाराने मैदानात येत त्यावर आक्षेप घेतला. खेळाडूंना परत देखील बोलावले. यामुळे सामना काही काळ थांबवण्यातही आला होता. मात्र, त्यानंतर पंचांनी आणि मॅच रेफ्रीने मध्यस्थी करत सामना पुन्हा सुरु केला. त्यानंतर महमुदुल्लाहनने तुफान फटकेबाजी करत सामना जिंकून दिला.

या विजयानंतर बांगलादेशी खेळाडू प्रचंड बेभान झाले आणि मैदानात येत त्यांनी एकच जल्लोष केला. मैदानावरचा जल्लोष आटोपल्यानंतर जेव्हा हे खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये गेले त्यावेळी त्यांनी तेथील काचेच्या दरवाज्याचीही तोडफोड केल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.

दरम्यान, याप्रकरणी मॅच रेफ्री क्रिस ब्रॉड यांनी केटरिग स्टाफशीही बातचीत केली. त्यामुळे आता याप्रकरणीही बांगलादेशच्या खेळाडूंवर कारवाई होण्याची शक्यता आहे.