विदेशी मद्यांच्या बाटल्यांची लाच घेणा-या पोलीस निरीक्षकाला पोलीस कोठडी

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन

विदेशी मद्यांच्या बाटल्या आणि एक लाखांची रोकड स्विकारताना पकडण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकास एक दिवसाची पोलीस कोठडी न्यानयालयाने सुनावली आहे. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास खोपोली पोलीस ठाण्यात घडली होती.

राजन नारायण जगताप (वय- ५३ वर्ष , पोलीस निरीक्षक, खोपोली पोलीस ठाणे, रायगड) असे लाचखोर पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. जगताप याने गुन्ह्यात अटक न करण्यासाठी एक लाख आणि दोन विदेशी मद्याच्या बाटल्यांची मागणी तक्रारदाराकडे केली होती. ही लाच स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते.

तक्रारदाराच्या भावावर खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला अटक करुन नये. तसेच तक्रारदारावर देखील गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी राजन जगताप याने चार लाख आणि दोन विदेशी मद्यांच्या बाटल्यांची लाच मागितली. तडजोडीत एक लाख रुपये आणि दोन विदेशी मद्यांच्या बाटल्या देण्याचे ठरले. तक्रारदाराने याची माहिती लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे केली. एसीबीच्या पोलिसांनी बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सापळा रचून एक लाख रुपये आणि दोन विदेशी मद्यांच्या बाटल्या घेताना रंगेहाथ पकडले.