विद्यार्थ्यांनी भारतीय अस्मिता जपावी: डॉ. विश्वनाथ कराड

पुणे: पोलीसनामा आॅनलाईन

भारतीय संस्कृती ही जगाला तत्वज्ञान आणि शांतीचा संदेश देणारी आहे. भारतीय संस्कृतीची अस्मिता आणि तिचे स्वत्त्व पाश्चात्त्य जगाला पटवून देण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन एमआयटी ग्रुप ऑफ इस्टीट्यूटचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ. दा. कराड यांनी केले.

एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनचा दहावा दीक्षांत समारंभ शुक्रवारी 16 मार्च 2018 रोजी एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ राजबाग, लोणी काळभोर, पुणे येथे पार पडलेलेल्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विश्वनाथ कराड बोलत होते. यावेळी एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड, एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे विश्वस्त आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. सुनील कराड, एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनचे अधिष्ठाता प्रा. अनंत चक्रदेव, प्रा. धिमंत पांचाळ आदी उपस्थित होते.

यावेळी पदवीचे 170 आणि पदव्युत्तर पदवीचे 115 असे एकूण 285 विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. विश्वनाथ. दा. कराड म्हणाले की, भारतीय समाज आणि संस्कृतीवर लादल्या व रुजल्या गेलेल्या परकीय धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय गुलामगिरीच्या जोडखडातून मुक्त करण्यासाठी स्वामी विवेकानंद यांनी आवाज उठवला. त्यांच्या कालखंडात भारतीय संस्कृतीची अस्मिता आणि तिचे स्वत्त्व पार धुळीला मिळाले होते. हे स्वत्त्व आणि ही अस्मिता आधुनिक भारताच्या इतिहासात पहिल्यांदा चैतन्यमय करण्याचे काम स्वामी विवेकानंद यांनी केले. जगासमोर भारतीय संस्कृतीची सर्वात्कृष्ट प्रतिमा मांडण्याचे काम ही स्वामी विवेकानंद यांनी केले. ते युवकांचे प्रेरणास्थान आहेत. युवा पिढीने त्यांच्या विचाराच्या माध्य़मातून जगासमोर भारतीय अस्मिता मांडण्याचे आणि भारतीय संस्कृतीचे सुसंस्कृत दर्शन घडविण्याचे काम करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.पुढे बोलताना डॉ. कराड म्हणाले की, भारतीय अस्मिताचे दर्शन जगाला घडावे, यासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या परिसरात जगातील सर्वात मोठा घुमट बाधण्याचे काम होत आहे. लवकरच या घुमटचे उद्घाटन जगातील सर्व धर्माच्या धर्मगुरूंच्या हस्ते करण्यात येईल. या घुमटच्या माध्यमातून जगभरातील संत, तत्वज्ञ यांचे पुतळे उभारण्यात येणार आहे. भारतीय संस्कृती आणि अस्मिता याची जापली जावी हा उद्देश यामागे आहे. युवा पदवीधारकांनी राष्ट्राच्या उभारणीच्या कार्यांमध्ये योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनचे संचालक प्रा. धिममंत पांचाळ म्हणाले की, एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनमधील शिक्षण हे सध्याच्या विविध कल्पनांवर आधारित आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या पदवी व पदवीत्तर शिक्षणाच्या काळात शैक्षणिक क्षेत्रापेक्षा कितीतरी जास्त उपक्रम राबविले जातात. भविष्यातील तयार करणाऱ्यात येणाऱ्या सर्व डिझाइनच्या पैलूंवर याठिकाणी अभ्यास केला जातो, असेही ते यावेळी म्हणाले, एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अधिष्ठाता प्रा. अनंत चक्रदेव म्हणाले, की आज एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनचा दहावा पदवीदान समारंभ होत आहे. आम्ही सर्व नवीन पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो. एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन हे डिझाईनचे अनेक कोर्स याठिकाणी घेतले जातात. व्यावसायिक शिक्षण देण्याबरोबरच नवनवीन कल्पनांना वाव देण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून केले जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रस्तावना आणि आभार प्रा. धिमंत पांचाळ यांनी केले.