विविध राज्यांत नोटबंदीची पुनरावृत्ती

देशातील विविध राज्यांत काही दिवसांपासून एटीएममध्ये पैसे उपलब्ध नसल्याने पुन्हा एकदा नोटबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील शहरांतल्या एटीएममध्ये आहे. या भागात अचानक रोख रकमेचा तुटवडा जाणवत आहे. एटीएमच्या बाहेर ‘NO CASH’ असे फलक लावण्यात आले आहेत. रोख रकमेसाठी नागरिक वारंवार एटीमच्या चकरा मारत आहेत. पण पैसे मिळत नसल्याने, विविध त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

अशी परिस्थिती का उदभवली? अचानक एटीएममध्ये पैसे का नाहीत? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. ही लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी आशा रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे. एक-दोन दिवसात परिस्थिती सामान्य होईल, असे आरबीआयने म्हटले आहे.

आसाम, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये नागरिकांनी गरजेपेक्षा जास्त रोख रक्कम काढल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे रिझर्व्ह बँकेच्या सूत्रांनी सांगितले. देशाच्या विविध राज्यांत सणासुदीचे दिवस असल्याने येथे जास्त रोकड नागरिकांनी काढली त्यामुळे हा तुटवडा पडल्याचे सांगितले जात आहे.

नागरिक आता बॅंकेत कमी प्रमाणात कॅश जमा करतात, त्यामुळे बॅंकेतच पैसे कमी आहेत. परिणामी एटीएममध्ये गरजेनुसार पैसे टाकले जात नाहीत. बॅंकेतून जेवढे पैसे बाहेर जातात तेवढे परत येत नाहीत. कारण, बॅंकेत रोख रक्कम जमा करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सुत्रांनी सांगितले.