विसराळू पुणेकर

मराठी माध्यमांच्या क्रमिक पुस्तकात असलेली ‘विसरभोळा गोकुळ’ ही गोष्ट अनेकांना आठवत असेल. गोष्टी विसरतो; म्हणून उपरण्याला गाठी मारणारा हा गोकुळचा आज उल्लेख करण्याचे कारण म्हणजे ‘लॉस्ट अँड फाउंड इंडेक्स’! ‘सर्वाधिक विसराळू शहरां’च्या यादीत पुणे आघाडीवर असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. पुणे आणि पुणेकरांनी वेगवेगळ्या स्वभावाने, वैशिष्ट्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ओळख मिळवली असताना, आता पुणेकर विसराळू म्हणून चक्क सातव्या क्रमांकावर आहेत. वाहतूक सेवा पुरवणाऱ्या ‘उबर’ने नुकत्याच केलेल्या ‘लॉस्ट अँड फाउंड इंडेक्स’ या सर्वेक्षणानुसार, पुण्याला हे रँकिंग मिळाले आहे, तर या यादीत बेंगळुरू पहिल्या क्रमांकावर आहे.

कॅबमध्ये नेमकी कोणत्या वेळी, कोणती वस्तू विसरली जाते, या आधारावर हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सकाळी लवकर म्हणजे सहाच्या सुमाराला आणि दुपारच्या जेवणानंतर म्हणजे दुपारी एक ते चार या सुस्त वेळेत वस्तू हरवण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे; तसेच सर्वाधिक वस्तू विसरल्या जातात त्या शनिवारी आणि रविवारी. सोमवार आणि शुक्रवारही यात आहेत. गेल्या वर्षभरात भारतात ‘उबर’मध्ये विसरलेल्या वस्तूंच्या यादीत अग्रक्रमावर मोबाइल फोन, बॅग, किल्ल्या, आयडी कार्ड, छत्री या वस्तू पहिल्या दहात आहेत. प्रवासी फक्त नेहमीच्या वस्तूच विसरतात, असे नाही, तर ते लग्नात देण्याच्या भेटवस्तूंपासून सोन्याच्या दागिन्यांपर्यंत, एलसीडी टीव्हीपासून मुलांच्या ‘टेंट हाउस’पर्यंत कित्येक गोष्टी विसरल्याचीही नोंद या कंपनीकडे आहे. आश्चर्य म्हणजे, पुण्यात २०१७ या वर्षात सर्वांत विसराळू दिवस होते २६ जून, २६ ऑगस्ट आणि ३१ डिसेंबर.

‘लॉस्ट अँड फाउंड इंडेक्स’ची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध करताना विसराळू प्रवासी ओळखून त्यांना वाहनातून उतरताना आपल्या वस्तू घेऊन उतरण्याची आठवणही आम्ही एका अॅपद्वारे करून देणार आहोत,’ असे कंपनीच्या विपणन विभागाचे प्रमुख संजय गुप्ता यांनी सांगितले.

– भारत, ऑस्ट्रेलिया आणि फिलिपिन्स हे देश आशिया-पॅसिफिक भागांतील ‘सर्वाधिक विसराळू देशां’च्या यादीत आघाडीवर

– पुणे हे आशिया पॅसिफिक भागातील १५व्या क्रमांकाचे विसराळू शहर

भारतातील सर्वाधिक विसराळू शहरे (रँकनुसार)

बेंगळुरू, नवी दिल्ली, मुंबई, हैदराबाद, कोलकाता, चेन्नई, पुणे, जयपूर, चंडीगढ आणि अहमदाबाद

सर्वाधिक विसरल्या जाणाऱ्या वस्तू

फोन, बॅग, वॉलेट, किल्ल्या/की कार्ड्स/लॉक, कपडे, ओळखपत्र/वाहन चालवण्याचा परवाना/पासपोर्ट, चष्मे किंवा गॉगल्स (आयवेअर),

बाटली, छत्री, दागिने