शहीद पोलिस नेहमीच स्मरणात

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – देशभरात दरवर्षी २१ ऑक्टोबरला शहीद पोलिस दिन साजरा केला जातो. सीमेवर शहीद होणार्‍या पोलिसांची संख्या वाढत आहे. जम्मू-काश्मिरसारख्या ठिकाणी पोलिसांवरील हल्ले वाढत आहेत. अन्यत्रही पोलिसांवर हल्ले केले जात आहेत. ही चिंताजनक बाब आहे. मात्र देशासाठी लढणारे शहीद पोलिस नेहमीच आपल्या स्मरणात राहतील असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी केले.

पोलिस मुख्यालयात रविवारी सकाळी शहीद पोलिस दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा अध्यक्षस्थानी होते. यावेळी मान्यवरांच्याहस्ते आतापर्यंत देशभरात शहीद झालेल्या 419 पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. लड्डाख येथे ऑक्टोबर 1959 मध्ये देशाचे रक्षण करणार्‍या पोलिसांच्या तुकडीने प्राणांची आहुती दिली होती. त्यानंतर त्यांच्यासह शहीद झालेल्या पोलिसांना मानवंदना देण्यासाठी तसेच त्यांच्याकडून प्रेरणा प्राप्त व्हावी यासाठी दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी शहीद पोलिस दिवस पाळला जातो.

एनडीआरएफ जवानांसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने पुरस्कार

प्रारंभी परेड सलामी शस्त्र, शोक शस्त्र करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्याहस्ते शहीद स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून शहीद पोलिसांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शहीद अधिकारी, पोलिस यांच्या यादीचे वाचन करण्यात आले. त्यानंतर बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना देण्यात आली.

यावेळी नांदेडचे विशेष पोलिस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, महापालिकेचे आयुक्त रविंद्र खेबुडकर, पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर, अनिकेत भारती, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, रविंद्र डोंगरे, प्रताप पोमण, मिलींद पाटील, सहाय्यक निरीक्षक संतोष डोके आदी उपस्थित होते.