शाळकरी मुलीचा डंपरच्या चाकाखाली येऊन मृत्यू 

पुणेः पोलिसनामा आॅनलाईन

दुचाकीला ओव्हरटेक करणार्‍या डंपरचा धक्का लागल्याने दुचाकीवरून पडून डंपरच्या चाकाखाली आल्याने सहा वर्षाच्या शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना काळे पडळ येथे बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. या घटनेत मुलीची आई किरकोळ जखमी झाली आहे.  आईसोबत शाळेतून घरी जात असताना दुचाकीला ओव्हरटेक करताना ही घटना घडली. डंपरचालकाच्या विरोधात  वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुपाली स्वप्नील जाधव असे तिच्या आईचे नाव आहे. मनसी स्वप्नील जाधव (6 वर्ष, कापडे वस्ती, फुरसुंगी) असे मयत मुलीचे नाव आहे. डंपर चालक  तुकाराम शांतप्पा बारणे (42,वडाची वाडी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मनसीचे वडील स्वप्नील जाधव हे कंपनीमध्ये काम करतात. तर तिची आई रुपाली ही गृहिणी आहे. मनसी काळेपडळ येथील एका शाळेत इयत्ता पहिलीत मानसी शिकत होती. तिला दररोज तिची आई रुपाली ह्या शाळेत सोडवायला आणि आणायला जाते. दररोजच्या प्रमाणे रुपाली जाधव ह्या त्यांची मोपेड घेऊन शाळेतून तिला आणण्यासाठी गेल्या होत्या. तिला शाळेतून घेऊन रुपाली या काळेपडळ येथून फुरसुंगी येथे घरी जात होत्या त्यावेळी मनसी त्यांच्या मागे बसली होती. याचवेळी त्यांच्या पाठीमागून तुकाराम बारणे हा डंपर(एम एच 12एच डी 3733) घेऊन येत होता. त्यांच्या मोपेडला ओव्हरटेक करत असताना डंपरचा धक्का मोपेडला लागला. त्यामुळे मनसी आणि तिची आई खाली पडल्या. मनस्वीची आई रुपाली ह्या बाजूला पडल्या. मात्र मनस्वी ही डंपरच्या मागच्या चाकाखाली आली आणि तिच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेले. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी डंपरचालक तुकाराम बारणे जबर चोप दिला. थोड्याच वेळात तेथे पोलिस दाखल झाले. तुकाराम बारणे याला मारहाण झाल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वानवडी पोलिस करत आहेत.