शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना अटक

रत्नागिरी : पोलीसनामा आॅनलाईन

नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करताना तीव्र आंदोलन केल्यामुळे राजापूर- लांजा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना राजापूर पोलिसांनी अटक केली. कोकणातील रत्नागिरीच्या राजापूर किनाऱ्यावर अणु ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित असतानाच, पुंन्हा या परिसरात दहा किलोमीटरच्या अंतरावर नाणार रिफायनरी प्रकल्प होतो आहे. या नियोजित प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. स्थानिकांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना देखील रस्त्यावर उतरली आहे. आमदार साळवी यांच्या बरोबर पंचायत समिती सभापती सुभाष गुरव, उपसभापती अश्विनी शिवणेकर, तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनाही अटक केली आहे.

नाणार प्रकल्पाचा वाढतावविरोध तीव्र होत असल्यामुळे पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून परिसरात मनाई आदेश लागू केला आहे. साळवी यांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले होते. मनाई आदेशाचा भंग करुन आमदार राजन साळवी यांनी आंदोलन केले. त्यामुळे त्यांच्यावर नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र आमदार साळवी यांना अटक करण्यात आल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.