शिवसैनिकांच्या खुनाच्या गुन्ह्यात आमदार संग्राम जगतापांना अडकवले : अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

सद्याच्या सरकार सोबत गेले तर सर्व ठीक अन्यथा त्यांच्याकडून राजकीय सूडबुद्धीने अडकवण्याचे काम चालू आहे. अहमदनगर मध्ये दोन शिवसैनिकांची हत्या झाली. त्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तरुण आमदार संग्राम जगतापांना अडकवण्यात आले आहे.अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आयोजित हल्ला बोल सभेच्या प्रसंगी सताधारी भाजपवर सडकून टीका केली.
यावेळी अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाईट काम करणाऱ्या पदाधिका-याला थारा दिला जाणार नाही. अशांना लगेच बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. मात्र नगर मधील हत्येच्या घटनेत संग्राम जगतापांना अडकवण्यात आले आहे. ही समाजाच्या दृष्टीने वाईट गोष्ट आहे. यातून समाजात चुकीचा संदेश जात असून  विरोधकांना अडकवण्याचे काम सताधारी पक्षाकडून होत आहे.

ते पुढे म्हणाले की,संग्राम जगताप प्रमाणेच छगन भुजबळ यांना देखील अडकवण्यात आले असून ते लवकरच बाहेर पडतील. त्यासाठी पत्रव्यवहार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अजित पवारांनी भाजप सरकारकरच्या काम करण्याच्या पद्धतीवर त्यांनी निशाणा साधला.

अजित पवार पुढे म्हणाले की,पुणे शहरात भाजपच्या आठ ही जागावर आमदार निवडून आले तर एका जागेवर खासदार निवडून आले. परंतु त्यांनी मागील चार वर्षांत पुणे शहराच्या हिताचा एकही निर्णय घेताना दिसले नाहीत. त्यांच्यामध्ये केवळ गटबाजी दिसून आली आहे. भाजपमध्ये चार गट असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केवळ एकच गट आहे. आणि तो शरद पवार गट असल्याचे सांगत भाजपच्या गटबाजीच्या राजकारणावर निशाणा साधला.

पुण्याची लोकसभेची जागा राष्ट्रवादी लढवणार : अजित पवार

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि पदाधिका-यांचे काम चांगले असून भविष्यात होणाऱ्या उमेद्वारांचा निकष लोकशाही प्रमाणे होणार आहे. बारामती आणि आंबेगावमध्ये देखील उमेद्वार निवडीचा नियम सारखा असणार आहे. हे लक्षात घेऊन पक्षात गटबाजी न करता सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचा सल्ला अजित पवार यांनी यावेळी दिला. पुणे लोकसभेची जागा राष्ट्रवादी लढवणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली.