शिवसैनिकांच्या हत्येशी राजकीय नेत्यांचा संबंध नाही : विशाल कोतकर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन

संजय कोतकर व रवी खोल्लम यांच्यामध्ये ७ एप्रिलला फोनवरून बोलताना वाद झाला होता. खोल्लम याने ही बाब विशाल कोतकरला सांगितली होती. त्यामुळे विशाल कोतकरने गुंजाळ याला खोल्लमच्या घरी प्रकरण मिटविण्यासाठी पाठविले. त्यावेळी खोल्लमच्या घरी गुंजाळ याची संजय कोतकर, वसंत ठुबे यांची भेट झाली़ तेथे संजय कोतकर आणि गुंजाळ यांच्यात वाद झाला. राग अनावर झाल्याने गुंजाळ याने स्वत:कडील गावठी कट्ट्यातून कोतकर आणि ठुबे यांना गोळ्या झाडून व गुप्तीने वार करून मारले. कोतकर व ठुबे यांना मार, असे मी अथवा इतर कोणीही गुंजाळ याला सांगितले नव्हते, अशी माहिती विशाल कोतकर याने पोलिसांना दिली आहे.

रवी खोल्लमच्या कुटुंबाला संरक्षण देण्यासाठी पाठविलेल्या संदीप गुंजाळ यानेच परस्पर दोघा शिवसैनिकांची हत्या केली. या घटनेशी कोणत्याही राजकीय नेत्यांचा संबंध नाही, अशी माहिती केडगाव दुहेरी हत्याकांडाचा केंद्रबिंदू ठरलेल्या नगरसेवक विशाल कोतकर याने पोलिसांना दिली.

कोतकर याला विशेष पथकाने मंगळवारी पहाटे कामरगाव (ता. नगर) परिसरातून अटक केली. दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रवी खोल्लम याची पोलीस कोठडी मंगळवारी संपत होती. त्यामुळे त्यालाही न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यालाही २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. पाटील यांनी दिला आहे.

केडगाव येथे ७ एप्रिल रोजी सेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची संदीप गुंजाळ याने हत्या केली. या घटनेनंतर गुंजाळ पोलिसांत हजर झाला. विशाल कोतकर फरार होता. या हत्याकांडाचा सूत्रधार म्हणून विशाल याचे नाव समोर आले. एलसीबीची टीम त्याचा शोध घेत होती. अखेर त्याला अटक झाली. पोलिसांनी पकडताच विशाल याने हत्याकांडाचा घटनाक्रम सांगितला.

केडगाव हत्याकांडातील संशयित आरोपींच्या संपर्कात आलेल्या ८० जणांची विशेष पथकाने आतापर्यंत चौकशी केली आहे़ यातील विशाल कोतकर, रवी खोल्लम, संदीप गुंजाळ यांना फोन करणाऱ्यांची चौकशी सुरू आहे.

केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आमदार संग्राम जगताप, संदीप गुंजाळ, बाळासाहेब कोतकर, भानुदास ऊर्फ बी. एम. कोतकर, रवी खोल्लम, संदीप गि-हे, महावीर मोकळे, बाबासाहेब केदार, विशाल कोतकर अशा ९ जणांना अटक केली आहे.

संबंधित घडामोडी:

शिवसेनेच्या दोन पदाधिका-यांची गोळ्या झाडून हत्या
शिवसेना पदाधिका-यांच्या हत्येप्रकरणी आरोपी पोलिसांकडे हजर
हत्येप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना अटक करण्याची मागणी
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलंबीत
भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांना पोलीस कोठडी
शिवसेना पदाधिका-यांच्या हत्येच्या तपासासाठी एआयटी
शिवसैनिकांच्या हत्येसाठी आरोपींना गावठी कट्टा पुरवणारा अटकेत
मारेक-यांना फाशी झाल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही : एकनाथ शिंदे
राष्ट्रवादीचे आमदरा संग्राम जगताप यांच्यासह पाच आरोपींच्या कोठडीत वाढ
केडगाव हत्याकांड त्या ४ पोलिसांना भोवले