शेतकरी सुखी, आनंदी आणि सुरक्षित राहू दे; चंद्रकांत पाटलांचे ज्योतिबाला साकडे

कोल्हापूर :पोलीसनामा ऑनलाईन

राज्यात चांगला पाऊस होऊ दे, चांगली पिकं येऊ दे, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळू दे आणि शेतकरी सुखी, आनंदी आणि सुरक्षित राहू दे, असे साकडे महाराष्ट्राचे महसूलमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दख्खनचा राजा श्री जोतिबाला घातले.

कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री जोतिबाचे दर्शन घेऊन पूजा केली. त्यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी येथील सासनकाठी क्रमांक एक या मानाच्या सासनकाठीचे पूजन करण्यात आले. तसेच सासनकाठी क्रमांक दोन विहे या सासनकाठीचेही त्यांनी पूजन केले. त्यांच्या समवेत जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, आमदार सतेज पाटील,आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सत्यजित पाटील, आमदार शंभुराजे देसाई, आमदार बाळासाहेब पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आदी उपस्थित होते.

राज्यात 12 लाख कोटींची विदेशी गुंतवणूक होत असून ही गुंतवणूक व्यवहारात येऊ दे, त्यातून शहरी भागातील बेरोजगारी कमी होऊ दे, अशी प्रार्थना जोतिबा चरणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. राज्यातील जनता सुखी, आनंदी आणि सुरक्षित होण्यासाठी श्री जोतिबानं बळ द्यावं, अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. श्री जोतिबा यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राचा कुलस्वामी श्री जोतिबाच्या यात्रेसाठी लाखोंचा भाविक जमला असून या यात्रेचे नेटकं नियोजन आणि चोख बंदोबस्त प्रशासनाने ठेवला आहे. उन्हाळा असल्याने भाविकांनी सुखरुपपणे, शांततेत यात्रा पार पाडून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.