संतापजनक… ! पत्नीस झाडाला बांधून पतीने केली बेल्टने मारहाण; लोक नुसते बघत राहीले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाच्या राजधानीपासून अवघ्या ६० किलोमीटर दूर असलेल्या बुलंदशहरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या ठिकाणी एका महिलेला भरदिवसा सर्वांसमोर झाडाला बांधून निर्दयपणे मारहाण केली. बाजूला असलेले लोक फक्त बघत राहिले. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पीडित महिला किंचाळत होती, ओरडत होती. तिच्या आजूबाजूला इतर नागरीक उपस्थित होते. मात्र, सर्वांनी बघ्याची भूमिका घेतली आणि कुणीही तिच्या बचावासाठी पुढं आलं नाही. उलट उपस्थित नागरीकांनी तिचा बचाव करण्याऐवजी मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात केली.

ही घटना बुलंदशहरमधील लोंदा गावात घडली आहे. या ठिकाणी ६०-७० जणांचा माणुसकी संपलेला जमाव तमाशा पाहत होता. मात्र, पीडित महिलेला होत असलेली मारहाण रोखण्यास कुणीही पुढे धजावले नाही. तसेच पोलिसांनाही बोलावले नाही.