संत भगवानबाबांच्या सप्ताहात पाहायला मिळाला सर्वधर्म समभाव

बीड : पोलीसनामा ऑनलाईन

शिरूर येथील तागडगांव येथे संत भगवान बाबा यांनी प्रारंभ केलेला नारळी सप्ताह सुरु आहे. राज्यातला सर्वात मोठा सप्ताह असा लौकिक असलेल्या सप्ताहासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय मुस्लिम बांधव करत असून सर्वधर्म समभावाचे दर्शन येथे घडत आहे.

महंत डॉ.नामदेव शास्त्री महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ८५ वा नारळी सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या सप्ताहासाठी राज्यासह परिसरातील मोठ्या संख्येने लोक उपस्थित असतात. पहाटे काकडा भजन, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण ,नंतर गाथा भजन , दुपारी पहाऱ्याचं भजन,रामायण कथा, सायंकाळी हरिपाठ, भगवान बाबांचे चरित्र वाचन, रात्री हरिकीर्तन,जागर भजन असे दैनंदिन कार्यक्रम सात दिवस सुरु असतात. या सप्ताहामध्ये रोज सकाळी ८ वाजता नाश्ता नंतर सकाळी ११ ते रात्री ११ या वेळेत भोजन सुरु असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यवस्था ठेवावी लागते. सप्ताहाचे नियोजन करताना वाहतूक,पार्किंग, जेवण, राहण्याची सोय, रात्रीची सुरक्षा, अशा विविध समित्या स्थापन करून स्वयंसेवक विनामूल्य सेवा करत असतात.

तागडगांव परिसरातील रायमोहा येथील मुस्लिम समाज याठिकाणी पिण्यासाठी फिल्टर पाणी पुरवठा करण्याची सेवा करत आहे. तर तागडगांव येथील मुस्लिम बांधव पार्किंगची व्यवस्था निष्ठेने पार पाडत असल्याचे पाहायला मिळत आहे. ही सेवा पाहून भगवान गडाचे मठाधिपती डॉ. नामदेव शास्त्री यांनी त्यांचे कौतुक केले आहे. भगवान बाबा यांनी दाखवलेला समतेचा मार्ग आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश येथे भक्तिभावपूर्वक कृतीत उतरवत असल्याचे पाहावयाला मिळाले आहे. भक्तिमय वातावरणात सुरु असलेल्या या नारळी सप्ताहाची सांगता ५ एप्रिल रोजी होणार आहे.