सत्ताधारी पक्षाकडून दिशाहीन अंदाजपत्रक विरोधकांची भाजपावर सडकून टीका

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन

पुणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एखाद्या सताधारी पक्षाकडून दिशाहीन अंदाजपत्रक मांडण्यात आले आहे. महापालिकेचे उत्पनाचे स्रोत दाखविण्यात सत्ताधारी पक्ष अपयशी ठरले आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपवर २०१८-१९ च्या अंदाजपत्रकाच्या सर्व साधारण सभेत सडकून टीका केली. तर विरोधकांचे आरोप खोडून काढत सताधारी पक्षाकडून हे अंदाजपत्रक शहराच्या विकासाला चालना देणारे आणि सर्व सामान्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देणारे अंदाजपत्रक असल्याचे सांगत विरोधकांना त्यांच्या शैलीत प्रतिउत्तर देऊन आजची सर्वसाधारण सभा अनेक आरोप प्रत्यारोपानी गाजली.

पुणे महानगरपालिकेचे २०१८-१९ चे अंदाजपत्रक स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सर्व साधारण सभेपुढे सादर केले. त्यावर आज झालेल्या सर्व साधारण सभेत तब्बल आठ तास चर्चा चालली. त्यामध्ये विरोधकांनी सताधारी पक्षावर आरोप करण्याची एक ही संधी सोडली नाही. या सर्व साधारण सभेची सुरुवात काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नगरसेवक आबा बागुल यांच्या भाषणाने करण्यात आली. ते यावेळी म्हणाले की, पुणे शहरातील विकासाच्या दृष्टीने यंदाच्या वर्षी सादर केलेले बजेट दिशाभूल करणारे असून एवढं बजेट सादर करताना उत्पनाचे स्रोत दाखविण्यात आले नाही. यावर गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.त्या पार्श्वभूमीवर मिळकत कर बुडवणाऱ्याकडे प्रशासनाने विशेष लक्ष दिल्यास भविष्यात महापालिकेच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच ते पुढे म्हणाले की, केवळ अंदाजपत्रकाच्या पानांची साईज वाढवून चालणार नसून उत्पन्न कसे वाढविता येईल. याकडे प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित करावे. तसेच चोवीस तास समान पाणी पुरवठा योजनेसह एसएमटीआरचा प्रश्न देखील मार्गी लागावा.अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सुभाष जगताप म्हणाले की,आजवर अनेक महापालिकेची अंदाजपत्रक पाहिले. मात्र हे पहिले अंदाजपत्रक दिशाहीन असून याचा अभ्यास केल्यास कोणत्याही एका प्रकल्पाला संपूर्ण निधी देण्यात आला नाही. त्यात प्रामुख्याने सर्व सामान्य नागरिकांच्या योजनाना देखील प्राधान्य देण्यात आले नाही. ही निषेधार्थ बाब असून त्यावर स्थायी समिती अध्यक्षांनी लक्ष देण्याची गरज होती. पण त्यांनी यावर लक्ष दिले नाही. याची खंत त्यांनी व्यक्त केली. तर ज्या प्रकल्पाना आणि योजनांना प्राधान्य देण्यात आले आहे. ते पूर्ण करावे. अशी अपेक्षा व्यक्त करीत ते पुढे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप ने नागरिकांची फसवणूक केली. त्या प्रमाणेच महापालिकेतील साताधारी भाजपने अंदाजपत्रकातील योजना वर्षाच्या शेवटी पाहिल्यावर त्या कागदावरच राहू नये. अशा शब्दात त्यांनी भाजपला सुनावले.

महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा राणी भोसले म्हणाल्या की, केंद्र आणि राज्य सरकार प्रमाणे पुणे महापालिकेत पारदर्शक कारभार करण्यात येत आहे. गतवर्षा प्रमाणे यंदाच्या वर्षांचे अंदाजपत्रक देखील सर्व सामान्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देणारे अंदाजपत्रक आहे. येणाऱ्या काळात शहरातील विविध प्रकल्पाना गती मिळण्यास मदत होईल. असेही त्यांनी सांगितले.

भाजप नगरसेविका स्वप्नाली सायकर म्हणाल्या,  यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये महिलांच्या प्रश्नाकडे प्राधान्य देण्यात आले असून भविष्यात कशा प्रकारे प्रकल्प मार्गी लागले जातील. याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. यामध्ये प्रत्येक घटकाला सामावून घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या सर्व साधारण सभेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक महेंद्र पठारे, नगरसेविका लक्ष्मी आंदेकर, रत्नाप्रभा जगताप, भाजप नगरसेवक दिलीप वेडेपाटील, अजय खेडेकर यांची भाषण या दरम्यान झाली. त्यानंतर ही सभा उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली असून उद्या अंदाजपत्रकावर चर्चा करून सर्व साधारण सभेत अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.