सदनिका पाहण्यासाठी गेलेल्या महिलेचा सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

गृहप्रकल्पामध्ये सदनिका पाहण्यासाठी गेलेल्या एका विवाहीत महिलेचा सहाव्या मजल्यावरुन तोल जाऊन मृत्यू झाला. ही घटना ४ मार्चला धायरी येथील विशाल पार्क व्हॅल्यू गृहप्रकल्पामध्ये घडली. या दुर्घटनेस जबाबदार असल्याच्या आरोपावरून प्रकल्प व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानसी विशाल दाभाडे (वय २८, रा. पौड फाटा, कर्वे रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी गृहप्रकल्पाचे व्यवस्थापक नीलेश प्रकाश जोशी (वय ३८, रा. रघुकुलनगरी, औंध रस्ता, बोपोडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी याबाबत सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाभाडे कुटूंबीय धायरी भागातील एका गृहप्रकल्पातील सदनीका पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेजारी असलेल्या पार्क व्हॅल्यू गृहप्रकल्पातील सदनिका पाहण्यासाठी ते गेले. परंतु ४ मार्चला रविवार असल्या कारणाने या ठिकाणी कामगार नव्हते.

मानसी आणि त्यांचे पती या गृहप्रकल्पाच्या सहाव्या मजल्यावर सदनीका पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने जाळ्या बसवण्यात आल्या नव्हत्या. मानसी यांचा तोल जाऊन त्या खाली पडल्या यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झला. व्यवस्थापकाने पुरेशी काळजी न घेतल्याने मानसी यांचा मृत्यू झाला अशी फिर्याद सहाय्यक पोलीस निरीक्षक गडकरी यांनी दिली आहे. सिंहगड रोड पोलीस तपास करत आहेत.