सद्यस्थितीत संघाला राजकारण टाळता येईल का?

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चिंतन बैठक पुण्यात आजपासून सुरु झाली आहे. ती बैठक पाच दिवस असणार आहे. बैठकीचा उद्देश सांगताना संघाचे सहसरकार्यवाह मनमोहनजी वैद्य म्हणाले की,” या बैठकीत आगामी निवडणुकीची चर्चा होणार नाही. संघाचा विस्तार अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. संघकार्याची दिशा ठरविणे हा बैठकीचा मुख्य हेतू असेल. विविध क्षेत्रात संघाचा विस्तार झाला आहे. संघाविषयी कुतूहल निर्माण झाले आहे ही वस्तुस्थिती आहे. एखादी संघटना मोठी होते तशी ती अनियंत्रित होते, मूळ उद्देशापासून भरकटली जाते याकरता त्या-त्या संघटनांच्या धुरीणांनी वेळीच दिशा निश्चित करणे आवश्यक असते. त्यादृष्टीने विचार करता संघाने योग्य वेळ निवडली आहे. संघाची चिंतन बैठक सुमारे ११ वर्षांपूर्वी धर्मस्थळ येथे झाली होती. आता बऱ्याच कालावधीनंतर पुण्यात होणारी ही बैठक महत्त्वाची आहे.

या दरम्यान सामाजिक घटना, कायदा-सुव्यवस्थेच्या घटना इतक्या घडत आहेत की त्या चिंतनीय आहेत. अजून एक वर्षानी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत घडणाऱ्या घटनांची प्रतिक्रिया या निवडणुकीत उमटेल अशा दिशेने वारे वहात आहेत. वेगवेगळ्या समाजघटकांना आरक्षणाची आश्वासने देण्यात आली. त्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने आरक्षणाचा मुद्दा राजकीय पातळीवर डोके वर काढू लगला आहे. उन्नाव आणि कथुआ येथील बलात्कार प्रकरणांमुळे सारा देश हादरला. पक्षभेदाच्या भिंती ओलांडून लोक प्रतिक्रिया देत आहेत तर, काहीजणं याला धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून समाजात चीड निर्माण झाली आहे.