समन्स आणि वॉरंटची जबाबदारी असणार पोलीसप्रमुखांवर

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

न्यायदान प्रक्रियेला गती मिळावी व अनेक तक्रारींचा निकाल लवकरात लवकर लागण्यास मदत व्हावी, यासाठी पोलिसांकडून बजावण्यात येणारे समन्स व वॉरंट वेळेत बजावने गरजेचे असते. मात्र पोलिसांकडून समन्स आणि वॉरंट वेळेत बजावले जात नाही. याचा फटका न्यायदान प्रक्रियेला बसतो आणि न्याय मिळण्यास उशीर होतो.

या सर्व गोष्टींचा विचार करता, न्यायदान प्रक्रियेला गती देण्यासाठी यापुढे समन्स आणि वॉरंट बजावण्याची जबाबदारी पोलीस प्रमुखांवर असणार आहे. यासाठी राज्याच्या गृह विभागाने ठोस पावले उचलली असून, या कामात दुर्लक्ष करणाऱ्या संबधित अधिकाऱ्याला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

समन्स आणि वॉरंट बजावने हे न्यायिक प्रक्रियेमधील अत्यंत महत्त्वाची बाब आहे. समन्स व वॉरंट निश्चित वेळेत बजावल्यास व त्याची अंमलबजावणी योग्य कार्यपद्धतीनुसार झाल्यास न्यायदान प्रक्रियेमध्ये गती येवून न्यायालयीन खटले दीर्घकाळ प्रलंबित रहात नाहीत.
राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांनी आपल्या हद्दीत प्राप्त होणारे समन्स आणि वॉरंट निश्चित कालावधीत बजावण्यात यावेत असा आदेश गृह विभागाने परिपत्रकाद्वारे जाहिर केला आहे.

समन्स आणि वॉरंटच्या अंमलबजाणीसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक स्वतंत्र विशेष पोलीस पथक कार्यरत आहे. या पथकाकडून समन्स-वॉरंट बजावणीची कार्यवाही होत आहे की नाही, याकडे पोलीस निरीक्षकांनी लक्ष द्यावे. प्रत्येक आठवड्यात दर सोमवारी आढावा घ्यावा. पोलीस निरीक्षकांनी प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला त्यांचा मासिक अहवाल सहायक पोलीस आयुक्त किंवा पोलीस उपअधीक्षकांना सादर करावा. त्यानंतर ते हा एकत्रित अहवाल पोलीस उपायुक्त किंवा पोलीस अधीक्षकांना सादर करतील. पोलीसप्रमुखांनी त्यांच्या महिन्याच्या गुन्हे बैठकीवेळी समन्स-वॉरंट बजावणीचा आढावा घ्यावा. ज्या पोलीस ठाण्यात अंमलबजावणी निश्चित कालावधीत होत नसल्यास त्याच्या कारणांचा शोध घेऊन कार्यवाही वेळोवेळी करण्याची दक्षता घ्यावी,असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.