ससून रुग्णालयाची 44 वी वार्षिक संशोधन परिषद

पुणे :पोलिसनामा ऑनलाईन

बी .जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे दि. 22 व 23 फेब्रुवारी रोजी वार्षीक संशोधन परिषद आयोजीत करण्यात आली आहे. वार्षिक परिषदेचे हे 44 वे वर्ष आहे. वैद्यकीय क्षेत्रात होणारे बदल व नवनवीन संशोधन यांची माहीती वैद्यकीय तज्ञांना, वैद्यकीय अध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना होण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात येते. अशी माहिती अधिष्ठाता डाॅ. अजय चंदनवाले यांनी दिली.

या परिषदेला 1200 पेक्षा अधिक वैद्यकीय तज्ञ व विद्यार्थी सहभागी होणार असून एकून 160 शोधनिबंध सादर करण्यात येणार आहेत. परिषदेतील चर्चेत अवयवदान व अवयव प्रत्यारोपण हा महत्वाचा विषय राहणार असून याचबरोबर यकृत व मूत्रपिंड प्रत्यारोपणावर तज्ञांची मार्गदर्शन व्याख्याने होणार आहेत. याशिवाय विविध परिसंवाद व मार्गदर्शनपर कार्यशाळा होणार आहेत.

मुख्य संशोधनापुर्वी दि.21 फेब्रुवारी रोजी पदवीपूर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यात विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर व्याख्याने, रेडीअोलाॅजी प्रश्नमंजुषा आणि जीवनसंजीवनी (बेसीक लाईफ सपोर्ट) ही कार्यशाळा होणार आहे. ही वार्षिक संशोधन परिषद यशस्वी होण्यासाठी अधिष्ठाता डाॅ. अजय चंदनवाले यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ. शेफाली पवार, प्राध्यापक व विभागप्रमुख, क्ष- किरणशास्त्र, डाॅ. राजेश उमप, डाॅ. सचिन बागले व डाॅ. इब्राहीम अन्सारी यांचे सहकार्य असणार आहे.

या परिषदेचे आयोजन क्ष-किरणशास्त्र विभागाने केले असून उद्घाटन नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डाॅ. एस.एन. पठाण यांच्या हस्ते होणार आहे.