सांगली, मिरजेत प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली आणि मिरज शहरात बसस्थानकावर रात्री उशिरा आलेल्या प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या 2 पथकानी सांगली, मिरजेत ही कारवाई केली. अभिजित नाईक, दादासाहेब आवळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून रिक्षा, मोटारसायकल, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सांगली, मिरजेत बसस्थानकावर रात्री उशिरा येणाऱ्या प्रवाशांना लुटणाऱ्याना तातडीने अटक करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. त्यानुसार शाखेचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दोन पथके तयार करून त्यांना संशयितांना पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एका पथकाला अभिजित नाईक हा रिक्षा चालक अडून त्याने असे गुन्हे केल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने सांगली बसस्थानकावर एका प्रवाशाला रिक्षात घेऊन आडबाजूला नेऊन लुटल्याची कबुली दिली. त्याला अटक करून रिक्षा जप्त करण्यात आली आहे. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमित परीट, निलेश कदम, शशिकांत जाधव, मेघराज रूपनर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान मिरजेत रात्री उशिरा बसस्थानकावर आलेल्या प्रवाशांना अडवून पोलीस असल्याचे सांगून लुटल्याप्रकरणी दादासाहेब आवळे यालाही अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक मोटारसायकल, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, साईनाथ ठाकूर, शशिकांत जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

फेसबुक पेज लाईक करा