सांबराच्या शिंगांची तस्करी करताना बेळगावात पाच जणांना अटक; हस्तिदंत सांगून करायचे विक्री

बेळगाव : वृत्तसंस्था

सांबराच्या शिंगांची विक्री करणाऱ्या पाच जणांना शहर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक करून त्यांच्याकडून सांबाराची शिंगे हस्तगत केली आहेत. सांबराची शिंगे , हस्तिदंत असल्याचे सांगून त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाल्याचे पोलीस आयुक्त डी. सी.राजप्पा यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.

बेळगुंदी येथील फार्म हाऊस मधून ही सांबाराची बारा किलो वजनाची शिंगे जप्त करण्यात आली आहेत. नागेश मादार, रामचंद्र दळवी, रवींद्र कोलकार, परशुराम निलजकर आणि अमन कणबर्गी अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.

जंगलातील प्राण्यांची हत्या करून त्यांची शिंगे बेळगुंदी येथील फार्म हाऊसमध्ये साठवण्यात येत होती. नंतर त्याला पॉलिश करून हस्तिदंत असे सांगून दिशाभूल करून सांबरच्या शिंगांची विक्री करण्यात येत होती. यापूर्वी या पाच व्यक्तींनी कोठे शिंगांची विक्री केलेली आहे याचा तपासही पोलिसांकडून करण्यात येत आहे. पकडण्यात आलेल्या पाच जणांवर वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेला पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.